अधिकार्यांची अनुपस्थिती : विद्युत वितरण कामकाज ढासळले वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने खंडित वीजपुरवठा
By admin | Published: May 18, 2014 07:57 PM2014-05-18T19:57:11+5:302014-05-18T23:49:05+5:30
वणी : कार्यान्वित अधिकार्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे वणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचे बारा वाजले असून, वारंवार होणार्या तांत्रिक बिघाडामुळे वणीकरांना खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत असून शेती, उद्योगधंदे व पाणीपुरवठा योजनांवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
वणी : कार्यान्वित अधिकार्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे वणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचे बारा वाजले असून, वारंवार होणार्या तांत्रिक बिघाडामुळे वणीकरांना खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत असून शेती, उद्योगधंदे व पाणीपुरवठा योजनांवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
एकलहरे विद्युत केंद्रातून ओझर, दिंडोरी, वणी, सुरगाणा या तालुक्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. दिंडोरी येथे १३२ के.व्ही. क्षमतेचे विद्युत केंद्र असून वणी येथे ३३ के.व्ही., पिंप्री येथे ३३ के.व्ही., करंजखेड येथे ३३ के.व्ही., सुरगाणा ३३ के.व्ही. अशा उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो.
मावडी, पांडाणे, नांदुरी, ओझरखेड, सगुणा महाजीवन प्राधिकरण तिसगाव, सुरगाणा, वणी या फिडरद्वारे ठिकठिकाणी वीजपुरवठा करण्यात येतो.
दिंडोरी तालुक्यातील वणी या गावात वितरण कंपनीच्या नियमानुसार समाधानकारक व अपेक्षित वसुली असल्याने या ठिकाणी भारनियमन नाही, असे वितरण कंपनीकडून सांगण्यात येते. मात्र वणी शहरी भागात या ना त्या कारणाने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. वणी शहरासाठी कार्यरत कनिष्ठ अभियंता गेल्या चार महिन्यांपासून वणीकरांनी बघितले नाही. तात्पुरता पदभार असणारे दुसरे अधिकारी आमावस्येला गेले की पौर्णिमेला उगवतात. ग्रामपालिकेत कार्यान्वित अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ग्रामसभेवर बदलीचा ठराव करून त्याची प्रत वरिष्ठ अधिकार्यांना पाठविली आहे; मात्र एक आमदाराचे संरक्षण या अधिकार्यांना असल्याने वणीकरांच्या नशिबी विद्युत समस्येचे भोग कायम आहेत. जी गत अधिकार्यांची तीच कर्मचार्यांची. बहुतांशी वायरमनचे वास्तव्य नाशिकला असल्याने किरकोळ तांत्रिक बिघाडपासून ते मोठ्या बिघाडाची जबाबदारी वणी येथे वास्तव्यास असणार्या वायरमनवर आहे.
या सर्व बाबींचा लेखाजोखा वारंवार ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व अधिकार्यांपुढे मांडूनही यातून समस्येचे निराकारण होत नसल्याने मुख्य अभियंत्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.