कार्यालयीन वेळेत अधिकाऱ्यांचे मद्यपान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:27 AM2017-07-20T00:27:36+5:302017-07-20T00:35:52+5:30
येवला पंचायत समिती : प्रशासन अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासमोर उघड झालेला प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी परिसीमाच गाठली. गावाला भेटीसाठी जात असल्याचे सभापतींना दूरध्वनीवरून सांगून ते चक्क हॉटेलमध्ये कार्यालयीन वेळेत मद्यपान करीत बसले. पंचायत समितीत स्वत:च्या कामासाठी आलेल्या लाभार्थीने हा प्रकार लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पंचायत समिती सदस्य, विस्तार अधिकारी व सामान्य प्रशासन अधिकारी यांनी दुपारी साडेचार वाजता तक्रारदारासह हॉटेलला भेट दिली असता विस्तार अधिकारी अनंत यादव व कृषी अधिकारी प्रशांत वास्ते हे मद्यप्राशन करताना आढळून आले.
दुपारी १ वाजता पंचायत समिती सदस्य अॅड.मंगेश भगत व मोहन शेलार पंचायत समितीत आले असता रोजगार हमी व कृषी कक्षाबाहेर तालुक्यातील लाभार्थींनी गर्दी केलेली होती. चौकशी केली असता अनंत यादव व प्रशांत वास्ते यांची वाट पाहत लोक थांबलेले होते. हालचाल रजिस्टरला तपासले असता दोन्ही अधिकारी कुठे गेले असल्याची नोंद नव्हती. पंचायत समिती सभापती आशा साळवे यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. त्यांनी यादव यांना दूरध्वनीवरून विचारले असता मी निमगाव मढ येथे बचतगटाच्या बैठकीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र दुपारी ४ वाजले तरी एकही अधिकारी कार्यालयात आला नाही. नायगव्हाणचे माजी सरपंच अशोक सदगीर यांनी सभापती कक्षात येऊन संबंधित दोन अधिकारी शहरातील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत असल्याचे गटनेते भगत व शेलार यांना सांगितले. सदर बाबीची सभापती साळवे यांना कल्पना दिल्यावर त्यांनी सहायक गटविकास अधिकारी व प्रशासन अधिकारी यांना सोबत घेऊन तक्रारदारासह संबंधित हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी हॉटेलला भेट दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कांतीलाल साळवे, माजी सरपंच अशोक सदगीर, चांदगावचे सरपंच संदीप गोराणे, ज्ञानेश्वर भागवत, रमेश साळवे, प्रमोद गोराणे, सुनील जाधव, त्र्यंबक सदगीर, माजी सरपंच अशोक साळवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाची प्रकरणे घेऊन येणाऱ्या तालुक्यातील ग्रामस्थांना गेल्या १५ दिवसांपासून विस्तार अधिकारी कर्तव्यावर उपस्थित नसल्याने प्रस्तावावर
स्वाक्षरी मिळत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थींनी थेट पंचायत समिती सभापती यांना निवेदन
दिले. निवेदनावर अशोक सदगीर, रमेश साळवे, प्रमोद गोराणे, त्र्यंबक सदगीर, बाळनाथ ढोणे, बाळासाहेब कुलकर्णी, सखाहरी ढोणे, अशोक साळवे, संदीप गोराणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.