कोरोनाच्या विस्फोटात अधिकारी मौनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:48+5:302021-04-10T04:14:48+5:30

नाशिक : ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला असताना आरोग्य यंत्रणेची सज्जता ...

Officers remain silent on the corona explosion | कोरोनाच्या विस्फोटात अधिकारी मौनात

कोरोनाच्या विस्फोटात अधिकारी मौनात

Next

नाशिक : ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला असताना आरोग्य यंत्रणेची सज्जता कशी आहे याबाबत संबंधित विभागाचे कोणतेही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने गोंधळात अधिकच भर पडत आहे. कोरोनाशी संघर्ष करीत हताश झालेले रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू असताना प्रशासनाकडून मात्र तत्परता दाखविली जात नसल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती असल्याने साहाजिकच आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण आला आहे. असे असले तरी येणाऱ्या संकटाचा सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचे दावे प्रशासनाकडून केले जात असताना त्यांचे दावे फोल ठरत असल्याचे नागरिकांच्या तक्रारींवरून समोर आले आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णांना घेऊन हॉस्पिटल्स शोधण्याची आलेली वेळ, व्हेंटिलेटरसाठी रुग्णालयाच्या दारात ॲम्ब्युलन्समध्येच पडून असलेला रुग्ण, रेमडेसिवीरसाठी लागलेल्या रांगा, जादा दराने होत असलेली विक्री, हॉस्पिटल्सकडून बिलांसाठी होणारी अडवणूक असे सारे प्रकार घडत असताना ज्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे, असे कोणतेही अधिकारी माध्यमांशीदेखील बोलण्यास तयार नसल्याचा अनुभव येत आहे. अधिकाऱ्यांच्या या मौनामागे प्रशासकीय कारवाईची भीतीदेखील असल्याची चर्चा शासकीय कर्मचारी वर्तुळात आहे.

शहरात अतिरिक्त बेड‌्सची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले असताना जादा बेड‌्ससाठीचा स्टाफ नसल्याने रुग्णांची परवड होत ्रअसल्याच्या तक्रारी आता नव्याने समोर आलेल्या आहेत. खासगी रुग्णालयांची मनमानी उघडपणे समोर आलेलीदेखील आहे. जिल्हा प्रशासनाकडून कागदोपत्री नियोजनाचे आराखडे आखले गेले असून, बैठकांमध्ये त्याबाबत दावेदेखील करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोरोनाग्रस्त झाल्यानंतर हक्काचा उपचार मिळू शकेल का, अशी शंका नाशिककरांच्या मनात निर्माण व्हावी, अशी एकूणच अवस्था झाली आहे.

या सर्व गोंधळाच्या आणि रुग्णांच्या जिवावर बेतणाऱ्या परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून मात्र मौन बाळगले जात आहे. अशा मौनाच्या परिस्थितीमुळे अधिकाऱ्यांवरील दबावाचीदेखील चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: Officers remain silent on the corona explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.