दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते ओहोळ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:37 AM2019-08-29T01:37:26+5:302019-08-29T01:37:43+5:30
दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) यांचे बुधवारी (दि.२८) सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले.
नाशिक : दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) यांचे बुधवारी (दि.२८) सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी दसक येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपनगर येथे त्यांचे वास्तव्य होते. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील फाळणे हे त्यांचे मूळ गाव. नोकरीनिमित्त ते ठाण्याला आले आणि तेथूनच चळवळीशी ते जोडले गेले. मुंबईत त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल अॅन्ड जनरल वर्कस फेडरेशनची स्थापना केली. या फेडरेशनचे अधिवेशन त्यांनी यशस्वी करून दाखविल्यानंतर ते अधिक चर्चेत आले. १९६५ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमिहीन सत्याग्रह आंदोलनातील २०२ सत्याग्रहींचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले. या आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नामांतर चळवळतही त्यांचा लक्षणीय सहभाग होता.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रा. सू. गवई यांच्याबरोबर ते १९८५ मध्ये संपर्कात आले. गवई यांच्याबरोबर त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. रिपाइं गवई गटाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तसेच उत्तर महाराष्टÑ अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. अखेरच्या श्वासापर्यंत ते गवई गटातच राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य संपदा आणि बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार यासाठी त्यांनी देशभरात अनेक प्रदर्शने भरविली. दलितांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. अनेक शासकीय आणि अशासकीय समित्यांवर त्यांनी काम केले. १९९५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले.