रस्त्यावर ऑईलची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:03+5:302021-01-16T04:18:03+5:30
भाजीपाल्याला मागणी वाढली नाशिक : मध्यंतरी कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची पिके काढून टाकल्याने त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. ...
भाजीपाल्याला मागणी वाढली
नाशिक : मध्यंतरी कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची पिके काढून टाकल्याने त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. यामुळे सध्या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. याशिवाय परजिल्ह्यातील भाजीपाला पिकांचेही नुकसान झाल्याने नाशिक येथील भाजीपाल्याला मागणी वाढली आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी
नाशिक : शहरात दिवसेंदिवस सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या वाढू लागली असून यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने कार्यक्रम आयोजकांना याबाबत सूचना द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
स्वच्छतागृहामुळे परिसरात दुर्गंधी
नाशिक : नाशिकरोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर उड्डाण पुलाखाली असलेल्या स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने या परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
एकलहरे कॉलनीतील सदनिकांची दुरवस्था
नाशिक : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात कामगारांची संख्या कमी झाल्याने या परिसरात असलेल्या वसाहतीमधील अनेक सदनिका रिकाम्या पडल्या आहेत. अनेक कामगारांनी स्वत:ची निवासस्थाने खरेदी केली असल्याने कॉलनीत फारसे कुणी रहात नाही. यामुळे या सदनिकांची दुरवस्था होऊ लागली आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : नाशिकरोड परिसरात रस्त्यांवर थांबणाऱ्या रिक्षांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अनेक रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा रस्त्यावर उभ्या करतात. यामुळे काही ठिकाणी पायी चालणेही कठीण होते. वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षाचालकांना समज द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सोमाणी उद्यानाचे काम पूर्ण करण्याची मागणी
नाशिक : नाशिकरोड येथील मुक्तीधामजवळील सोमाणी उद्यानाचे मागील अनेक दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे उद्यान बंद आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.