पावसाने ओझरखेड कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 10:54 PM2021-10-09T22:54:17+5:302021-10-09T22:54:53+5:30
चांदवड : तालुक्यातील दक्षिण पुर्व भागात शुक्रवारी (दि.८) ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओझरखेड कालवा फुटला तर पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून रेल्वेचा भुयारी मार्ग बंद होऊन गावांचा संपर्क तुटला.
चांदवड : तालुक्यातील दक्षिण पुर्व भागात शुक्रवारी (दि.८) ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओझरखेड कालवा फुटला तर पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून रेल्वेचा भुयारी मार्ग बंद होऊन गावांचा संपर्क तुटला.
दिघवद मंडलात सुमारे ४३ मिमी पाऊस झाला तर रायपूर मंडलात अवघा सात मिमी पावसाची नोंद झाली. परिसरात वीजच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे वाहेगावसाळ जवळ ओझरखेड कालवा चारी क्रमांक ३३ जवळ फुटल्याने रेशमा खैरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने ओझरखेड कालवाबद्दल पुन्हा निकृष्ठ कामावर बोट दाखविले जात आहे.
परिसरातील वाहेगावसाळ, रेडगावखुर्द, वाकी बुदरुक, काळखोडे, साळसाणो, तळेगावरोही, वडगावपंगु, रायपूर, वागदर्डी, सोनीसांगवी, काजीसांगवी, पन्हाळे, निंबाळे, गंगावे, हिवरखेडे, गणूर, दरसवाडी, विटावे या गावांना जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, कांदा आदी पिकाचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या कालव्याला धरणाचे पाणी सोडले नाही तर पावसाच्या पाण्यामुळे वहन क्षमता व कामाच्या गुणवत्तेवर चर्चा होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वडगावपंगुचे विठ्ठल चव्हाण यांनी आमदार व केंद्रीय मंत्री नामदार भारती पवार यांच्याकडे केली होती. तर येवला व नांदगाव सारखे पंचनामे तात्काळ करावे अशी मागणी केल्याने तातडीने केंद्रीय आरोग्य मंत्री नामदार डॉ. भारती पवार , आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे व मान्यवरांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त भागाची दौरा करुन संबधीत अधिका:यांना नुकसानीचे पंचनामे करावे असे आदेश दिले. दरम्यान वडगावपंगु जवळील रेल्वे गेट व अंडरपास पाण्याखाली गेल्याने येथील नागरीकांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्र्याकडे केली असून याकडे तातडीने रेल्वे प्रशासनाशी बोलुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ.पवार यांनी दिले.