ओझरचा खंडेराव महाराज यात्राेत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:03 PM2020-12-15T18:03:53+5:302020-12-15T18:04:38+5:30
ओझर : शेकडो वर्षांची परंपरा असलेला ओझरचा खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यात्रा कमिटी, महसूल, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत पोलीस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार राज्यातील इतर सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराज यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यात्रा सुरु राहिल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचण येईल, त्यामुळे बारा गाड्यांची मिरवणूक करता येणार नाही. परंतु स्थानिक ठिकाणी बारा गाडे ठेवून मानकरी कुटुंबातील सदस्यांकडून पूजा अर्चा करुन घ्यावी असेही डॉ. भोसले यांनी सांगितले. चंपाषष्ठीनिमित्त भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येता येईल. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन पाच ते सहा फुटांचे अंतर ठेवून दर्शन घ्यावे. चंपाषष्ठीच्या दिवशी बारा गाडे ,मोंढा गाडा (देवाचा गाडा) मिरवणूक तसेच कुठलाही सार्वजनिक उत्सव करता येणार नाही. भाविकांनी विनाकारण गर्दी करुन नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जातील, याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.
यावेळी तहसीलदार शरद घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा कदम, ग्रामसेवक डी. बी. देवकर, प्रशासक कैलास गादड ,डॉ. अक्षय तारगे, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, धनंजय पगार , युवराज शेळके, कार्याध्यक्ष राम कदम ,खजिनदार अशोक शेलार, विठ्ठल कर्पे, कांचन जाधव ,परशराम शेलार ,बापू चौधरी ,हरिभाऊ पगार ,प्रशांत पगार ,प्रशांत चौरे,रामदास शेजवळ,विठ्ठल मंडलिक,सुरेश कदम आदी उपस्थित होते.