ओझरची खंडेराव महाराज यात्रा यंदाही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 11:15 PM2021-12-01T23:15:46+5:302021-12-01T23:15:46+5:30
ओझर : शेकडो वर्षांची परंपरा असलेली ओझर परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा यंदा या इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत दिली. यात्रा कमिटी, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन नगरपरिषद व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
ओझर : शेकडो वर्षांची परंपरा असलेली ओझर परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा यंदा या इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत दिली.
यात्रा कमिटी, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन नगरपरिषद व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ओझरची खंडेराव महाराज यात्रा रद्द करण्यात आली आहे.
यात्रा सुरू राहिल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचणी येतील व त्यामुळे बारागाडी मिरवणुका करता येणार नाही परंतु स्थानिक ठिकाणी बारा गाड्या ठेवून मानकरी कुटुंबातील सदस्यांकडून पूजाअर्चा करून घ्यावी, असे यावेळी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले. चंपाषष्ठीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांना येता येईल मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून भाविकांनी दर्शन घ्यावे. पाच ते सहा फुटाचे अंतर ठेवून दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी तलाठी सागर शिरखे, मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी, प्राथमिक आरोग्य कर्मचारी अनिल राठी, यतीन कदम, नितीन काळे, प्रकाश महाले, सागर शेजवळ, सागर राऊत, भारतपगार, वसंत गवळी, यात्रा कमिटी उपाध्यक्ष युवराज शेळके, ज्येष्ठ नागरिक विठ्ठल कर्पे, पोलीस कर्मचारी नितीन करंडे, अंबादास गायकवाड, अनुपम जाधव, इम्रान खान उपस्थित होते.