मालेगावचे जुने बसस्थानक फुलले प्रवाशांच्या गर्दीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:59 PM2018-11-11T17:59:39+5:302018-11-11T18:00:07+5:30
दीपावलीसाठी गावाकडे आलेल्या माहेरवाशिणींसह चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी गर्दी केल्याने मालेगाव शहरातील नवे व जुने बसस्थानक फुलून गेले आहे.
जुना मुंबई आग्रा महामार्गावर म्युनिसिपल हायस्कूलपासून सुपर मार्केट दरम्यान नवीन पुलाचे काम सुरू असल्याने नव्या बसस्थानकावरुन जाणाऱ्या बसेस जुन्या बसस्थानकावरुन सुटत असल्याने या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या अजुन असल्या तरी भाऊबिजेसाठी आलेल्या भगिनी आता आपल्या मुलाबाळांसह पुन्हा सासरी निघाल्या असून त्यांना पोहचविणाºया पालकांनीही गर्दी केली आहे. यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट होते. तरीही नागरिकांत अमाप उत्साह दिसून आला. नवीन बस स्थानकावर नेहमी असणारी गर्दी यावेळी जुन्या बसस्थानकावर दिसत आहे. मालेगाव एसटी आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्याही सुरू केल्या. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मालेगाव एसटी आगाराने पुणे, माहुरगड, अक्कलकोट, नाशिक, चाळीसगाव या मार्गावर जादा गाड्या सुरू केल्या आहेत. दहा टक्के भाडे वाढवूनही प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. काही प्रवाशी मात्र खासगी वाहनांचा उपयोग करताना दिसत आहेत. प्रवाशांना सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाच्यावतीने विविध ठिकाणी जाणा-या गाड्या उशिरापर्यंत सोडण्यात येत आहेत. त्यामुळे खासगी वाहतूक करणा-या चालकांनी याचा फायदा घेतला.
दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज अशा सलग तीन दिवसांच्या सुट्या जोडून आल्याने ग्रामीण भागातही बाहेरगावहून आलेल्या लोकांची गर्दी झाली होती. परंतु ब-याच बसेसला फलक नसल्याने लोकांची तारांबळ उडताना दिसत होती. बसमध्ये जागा सांभाळण्यासाठी लोकांमध्ये वाद होत असल्याचे दिसून आले. एस.टी.ने भाडेवाढ केल्याने त्याचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसला. प्रवाशांच्या गर्दीत हात साफ करणाºया चोरट्यांमुळे प्रवाशात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.