जुने बसस्थानक की चोरट्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:07 AM2017-08-28T00:07:31+5:302017-08-28T00:07:37+5:30
शहरातील जुने मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनला असून, गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान दागिने व पैसे लंपास करण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष म्हणजे ‘हात’ मारणाºयांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने घोळका करून वृद्ध, महिलांना घेरून त्यांच्या पिशवीतील चीजवस्तू हातोहात लांबविल्या जात आहेत.
नाशिक : शहरातील जुने मध्यवर्ती बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनला असून, गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान दागिने व पैसे लंपास करण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष म्हणजे ‘हात’ मारणाºयांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने घोळका करून वृद्ध, महिलांना घेरून त्यांच्या पिशवीतील चीजवस्तू हातोहात लांबविल्या जात आहेत. जुने मध्यवर्ती बसस्थानकातून कळवण, सटाणा, देवळा, दिंडोरी, वणी, घोटी, इगतपुरी यांसह नंदुरबार व काही लांबपल्ल्याच्या बस सोडल्या जातात. सध्या त्र्यंबक मेळा स्थानकातील काही बसेसही या ठिकाणाहून काही दिवसांपासून सोडल्या जात असल्यामुळे साहजिकच प्रवाशांची या ठिकाणी गर्दी होत आहे. नेमका याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांमध्ये प्रामुख्याने महिलांचा भरणा अधिक आहे. एखाद दुसरा पुरुष त्यांच्यासोबत ठेवला जातो, जेणे करून कुटुंबातील सदस्य असल्याचे भासविले जाते. या महिलांच्या हातातही प्रवासाला जातो तशा पिशव्या सोबत असतात. बसचे आगमन झाल्यास जागा पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी रेटारेटी त्यांच्या पथ्थ्यावर पडते. सावज हेरून तीन ते चार महिला प्रवाशाला घेरतात व त्याच्या खिशातील अथवा बॅगेतील ऐवज हातोहात लंपास करून या महिला पुन्हा गर्दीतून पसार होतात. हाती घबाड लागल्यावर तत्काळ बसस्थानकातून पोबारा करायचा व तास, दीड तासाने पुन्हा नवीन सावज हेरले जाते. एकट्या जुन्या बसस्थानकात चोरट्यांच्या चार ते पाच टोळ्या आहेत. दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एका बसमध्ये शिरण्यासाठी प्रवाशांची लागलेली चढाओढ या चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली व पाच ते सहा प्रवाशांचे भ्रमणध्वनी लांबविले गेले. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात येऊन बसची झडती घेण्यात आली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले. या बसस्थानकाचा वापर करणारे बाहेरगावचे प्रवासी घरी गेल्यावर किंवा बसमध्येच त्यांच्या लक्षात चोरी झाल्याचे लक्षात येत असल्याने पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे बसस्थानकातील वाढत्या चोºयांबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल होत नाही.