शनिचौकात जुन्या वाड्याची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:58 AM2019-07-29T00:58:00+5:302019-07-29T00:58:24+5:30
नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शनिचौक परिसरातील सोन्या मारुती मंदिराजवळील पवार वाड्याची भिंत रविवारी (दि २८) दुपारी कोसळली. या घटनेत रिक्षाचालकासह त्याची बहीण असे दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पंचवटी : नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शनिचौक परिसरातील सोन्या मारुती मंदिराजवळील पवार वाड्याची भिंत रविवारी (दि २८) दुपारी कोसळली. या घटनेत रिक्षाचालकासह त्याची बहीण असे दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यानंतर महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाड्यातील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.
शनिचौक परिसरात पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा पवार वाडा असून, याठिकाणी पाच ते सहा भाडेकरू राहतात. दोन तीन दिवसांपासून संपूर्ण शहरात पावसाची संततधार सुरू असून, रविवारी दुपारच्या सुमाराला पवार वाड्याची भिंत कोसळली. यावेळी वाड्याबाहेर उभ्या असलेल्या रिक्षा (एमएच १५ झेड ९६६८) मध्ये चालक कृषांत कपिल काची (२९) व त्याची बहीण कामिनी लक्ष्मण धागजे असे दोघे बसले असताना अचानक वाड्याची भिंत कोसळली. रिक्षावर वीट, मातीचा ढिगारा पडल्याने काची व त्याची बहीण कामिनी असे दोघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाड्यात बबन शिरसाठ, अंजीना काची, शारदा चौधरी, नागेश आव्हाड, तुषार पंडित आदी भाडेकरू राहात असून, या सर्वांना सुरक्षेची खबरदारी म्हणून वाड्याबाहेर काढण्यात आले आहे. वाड्याची भिंत कोसळल्याची माहिती परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पंचवटी अग्निशमन दलाचे सहायक अधिकारी जे. एस अहिरे, एस. जी. कानडे, नितीन म्हस्के, डी. पी. पाटील, एम. एच. गायकवाड, एस. डी. भालेराव, एम. एस. पिपळे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाड्यात अडकलेल्या सर्वच रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.
वाड्यातून सुटका करण्यात आलेल्या सर्वांची महापालिकेतर्फे गणेशवाडीत राहण्याची सोय करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काची यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्याची बहीण कामिनी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.