जुने ‘सीबीएस’ गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:26 AM2017-09-16T00:26:43+5:302017-09-16T00:26:49+5:30
दहा वर्षांपूर्वी एस.टी. बस व प्रवाशांच्या गर्दीने खच्चून भरणाºया जुने मध्यवर्ती बसस्थानकाला काही काळापुरते का होईना गत वैभव प्राप्त झाले असून, त्र्यंबक मेळा स्टॅण्डवरून सुटणाºया सर्वच बसेस काही काळासाठी आता जुन्या स्थानकावरून सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने बसस्थानकातील व्यावसायिकांनाही ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत.
नाशिक : दहा वर्षांपूर्वी एस.टी. बस व प्रवाशांच्या गर्दीने खच्चून भरणाºया जुने मध्यवर्ती बसस्थानकाला काही काळापुरते का होईना गत वैभव प्राप्त झाले असून, त्र्यंबक मेळा स्टॅण्डवरून सुटणाºया सर्वच बसेस काही काळासाठी आता जुन्या स्थानकावरून सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने बसस्थानकातील व्यावसायिकांनाही ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत. एकेकाळी चोवीस तास लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्यांची रेलचेल, पाय ठेवालयाही जागा न ठेवणाºया प्रवाशांची खच्चून भरलेली गर्दी, विक्रेत्यांच्या आवाजाचा दणदणाट, अधूनमधून फलाट क्रमाकांवरून सुटणाºया गाड्यांच्या कर्णकर्कश भोंग्याच्या माध्यमातून होणारी घोषणा, देश-परदेशाबरोबरच सकाळच्या गाडीने शहरात दाखल झालेले ग्रामीण भागातील शेतकºयांची भाजीपाल्याची बोचकी, पोस्टाचे टपाल, टपावर ठेवलेल्या सामानाच्या चढ उतारासाठी हमालांची असलेली धडपड, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची धावपळ अशा एक नव्हे तर अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिलेल्या शहरातील सर्वांत जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाची दहा ते बारा वर्षांपूर्वी रयाच गेली होती. बसस्थानक अपुरे पडत असल्याने एस.टी.महामंडळाच्या ताब्यात असलेल्या मेळा बसस्थानकानजीकच्या जागेवर बीओटी तत्त्वावर नवीन बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. या नवीन बसस्थानकामुळे जुन्या बसस्थानकावरून सुटणाºया लांब पल्ल्याच्या बसेसचे स्थलांतर करण्यात आले, त्यानंतर त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यांतील गावांसाठी सुटणाºया बसेस त्र्यंबक मेळा स्टॅण्डवर हलविण्यात आल्या. परिणामी जुन्या बसस्थानकाला अवकळा प्राप्त झाली. बोटावर मोजण्याइतक्याच पेठ, कळवण, सटाणा, दिंडोरी, साक्री, इगतपुरी या मार्गांवर धावणाºया बसेसच्या ये-जा पुरतेच मर्यादित असलेले जुने बसस्थानकावर सायंकाळनंतर प्रवाशांची शुकशुकाट होते. रात्री फक्त मुक्कामी बसेस याठिकाणी उभ्या करण्यासाठी स्थानकाचा वापर केला जात असल्याने या बसस्थानकाला अवकळा प्राप्त झाली.
काळानुसार प्रवाशांची गरज ओळखून एस. टी. महामंडळानेही कात टाकायला सुरुवात केल्याने प्रवाशांना अधिकाधिक सोयी, सुविधा पुरविण्यासाठी बसस्थानकांचे अद्यावतीकरण, लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये वाय-फाय सुविधा देऊन एस. टी. महामंडळ हायटेक होण्याचा प्रयत्न करीत असून, त्याचाच भाग म्हणून त्र्यंबक मेळा स्टॅण्डवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने ‘बस पोर्ट’ची निर्मिती केली जात आहे.