जुन्या वादातून तडीपार गुंडाचा त्याच्याच मित्रांनी काढला काटा; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
By अझहर शेख | Published: July 7, 2024 02:22 PM2024-07-07T14:22:15+5:302024-07-07T14:25:12+5:30
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी पांडुरंग शिंगाडे याच्यावर घरात शिरून चॉपर, कोयत्याने छाती व बरगडीवर सपासप वार करून जीवे ठार मारल्याची घटना घडली होती.
नाशिक : जुन्या वादातून मनात राग धरत वचपा काढण्याच्या इराद्याने तडीपार गुंड पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे याचा पंचशीलनगर गंजमाळ येथील राहत्या घरात तिघांनी धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. भद्रकाली पोलिसांनी संशयित आरोपी कैलास नंदू गायकवाड (रा.गंजमाळ), ऋतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड (२१,रा.पंचशीलनगर) या दोघांना बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे.
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी पांडुरंग शिंगाडे याच्यावर घरात शिरून चॉपर, कोयत्याने छाती व बरगडीवर सपासप वार करून जीवे ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्याचा भाऊ हनुमंत शिंगाडे याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात हल्लेखोरांविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम (बीएनएस) १०३(१) व ३५१(२) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून वरिष्ठ पोलिस निरिक्षक गजेंद्र पाटील, संतोष नरुटे, विक्रम मोहिते यांचे गुन्हे शाेध पथक हल्लेखोरांचा शहरातील विविध भागांत शोध घेत होते.
गुन्हे शोध पथकाचे हवालदार कय्युम सय्यद, अविनाश जुंद्रे यांना संशयित हल्लेखोर हे सातपूर भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. यानंतर सातपूर भागात सहायक निरिक्षक वसंत पवार, सहायक उपनिरिक्षक यशवंत गांगुर्डे, हवालदार नरेंद्र जाधव, सतिष साळुंके, संदीप शेळके आदींच्या पथकांनी दोन सापळे रचले. यावेळी तेथे कैलास व विधीसंघर्षित बालक हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या दोघांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कैलासकडे याप्रकरणी सखोल चौकशी केली असता त्याने तीसऱ्या साथीदाराचे नाव उघड केले. शहर आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने ऋतिक उर्फ लाड्या यास या गुन्ह्यात ध्रूवनगर या भागातून ताब्यात घेतले, अशी माहिती गजेंद्र पाटील यांनी दिली.