नाशकात वृध्दाची गळा चिरुन हत्या; दीड महिन्यांत आठवा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 08:42 PM2021-02-17T20:42:39+5:302021-02-17T20:43:10+5:30
नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या.
नाशिक : शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कधी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये दंगलीचा भडका उडतो तर कधी कौटुंबिक वादातुन एखाद्याची हत्या होते. दोन दिवसांपुर्वी भाऊबंदकीच्या वादातुन झालेल्या मारहाणीत शिंदे गावात सख्या भावाला ठार मारल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपासाला गती येत नाही, तोच बुधवारी (दि.१७) शहरातील गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवली गावात एका ७५वर्षीय वृध्दाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार संध्याकाळी उघडकीस आल्याने नाशकात जणु खुनाची मालिकाच सुरु झाली की काय अशी शंका घेतली जात आहे.
गंगापुररोडवरील आनंदवली गावाच्या शिवारात राहणारे रमेश मंडलिक (७५) या वृध्दाचा संशयितांनी धारधार शस्त्राने गळा चिरल्याने मंडलिक हे जागीच ठार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ श्वान पथकासह न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मंडलिक यांच्या मारेकऱ्यांच्या शोधात त्वरित गंगापुर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखेचे पथकाला रवाना करण्यात आले.
दरम्यान, नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या. गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत दीड महिन्यांत हा दुसरा खुन आहे. यापुर्वीही आनंदवली शिवारात मद्यपी मित्रांमध्ये वाद होऊन एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगड टाकून त्यास जागीच ठार केले होते.