सरकारवाड्यात जुन्या आठवणीत रमले नाशिककर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:27 AM2019-05-19T00:27:50+5:302019-05-19T00:28:06+5:30
मातीची भांडी आजच्या विसाव्या शतकात कालबाह्य झाली... नव्या पिढीला मातीच्या भांड्यांची केवळ खेळणीतूनच ओळख... कधीकाळी स्वयंपाकापासून भोजनापर्यंत अशाच मृदभांड्यांचा वापर होत असे, हे या पिढीच्या बहुदा गावीही नसावे...सरकारवाड्याच्या पुरातन वास्तूत आबालवृद्ध नाशिककर मातीच्या गोळ्याला आकार देण्यात दंग झाल्याचे चित्र शनिवारी (दि.१८) पहावयास मिळाले.
नाशिक : मातीची भांडी आजच्या विसाव्या शतकात कालबाह्य झाली... नव्या पिढीला मातीच्या भांड्यांची केवळ खेळणीतूनच ओळख... कधीकाळी स्वयंपाकापासून भोजनापर्यंत अशाच मृदभांड्यांचा वापर होत असे, हे या पिढीच्या बहुदा गावीही नसावे...सरकारवाड्याच्या पुरातन वास्तूत आबालवृद्ध नाशिककर मातीच्या गोळ्याला आकार देण्यात दंग झाल्याचे चित्र शनिवारी (दि.१८) पहावयास मिळाले.
जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधत पुरातत्त्व विभागाच्या प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाच्या वतीने शनिवारी सरकारवाडा येथे मातीची भांडी बनविण्याची कार्यशाळा मोफत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत बालवयापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रवेश खुला होता. यामुळे आपल्या लहान मुलांना सरकारवाड्याच्या छत्राखाली आणलेल्या नाशिककरांनीसुद्धा जुन्या नाशकातील क्षीरसागर बाबा (कुंभार मामा) यांच्याकडून मातीची भांडी बनविण्याची कला शिकून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यशाळेच्या प्रारंभी संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहने यांनी उपस्थित नाशिककरांना कार्यशाळेचे उद्दिष्ट, संग्रहालय दिनाचे महत्त्व, सरकारवाड्याची माहिती आणि प्रादेशिक वस्तू संग्रहालयात जतन केलेला अमूल्य ठेवा याविषयी माहिती दिली.
न्याहाळला अमूल्य ठेवा
मातीची भांडी बनविण्याच्या कार्यशाळेच्या निमित्ताने सरकारवाड्यात आलेल्या नाशिककर आबालवृध्दांनी येथील वस्तुसंग्रहालयामधील अमूल्य असा वारसा ‘याचि देही याचि डोळा’ न्याहाळला. पाषाण शिल्प, जैन तीर्थकारांच्या मूर्ती, हिंदू देव-देवतांच्या मूर्तींसह प्राचीन नाणी, तलवारी, ठासणीच्या बंदूकांसारखे शस्त्रांचा संग्रहित ठेवा बघून नाशिककर अवाक् झाले.