जुने नाशिक : वाडा कोसळल्याने पाच जण अडकले; दोघे रेस्क्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 03:46 PM2018-08-05T15:46:34+5:302018-08-05T15:55:41+5:30
कुटुंबातील सदस्य जेवण करुन बाहेर येऊन ओट्यावर शेजा-यांशी गप्पा मारत बसले होते. काही वेळाने हे कुटुंब पुन्हा घरात गेले आणि त्याचवेळी अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने वाड्याचा धोकादायक झालेला भाग कोसळला. आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी एकच धाव घेतली.
नाशिक : जुने नाशिक या गावठाण परिसरातील जुनी तांबट गल्लीमधील एक वाडा दूपारी एक वाजेच्या सुमारास अचानकपणे कोसळल्याने वाड्यामधील काळे कुटुंबीय मलब्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी आदि यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. सुमारे तीन तासांपासून बचावकार्य सुरू असून ढीगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या दोघा रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यास यश आले आहे. अन्य तीन रहिवाशी अद्याप माती, विटांच्या ढीगा-याखाली अडकल्याची भीती अग्निशामक दलाकडून व्यक्त होत आहे.
याबाबत अद्याप मिळालेली माहिती अशी, जन्या नाशकातील तांबट गल्ली, तिवंधा, म्हसरुळटेक, डिंगरअळी, कुंभारवाडा या गावठाण परिसरात जुने धोकादायक वाड्यांची संख्या अधिक आहे. बहुतांश वाड्यांमध्ये नागरिक वास्तव्यास आहे. काही वाडेमालकांनी भाडेकरुदेखील ठेवले आहेत तर काही वाड्यांचे वाद न्यायप्रविष्ट आहेत. दरम्यान, जुन्या तांबटगल्लीतील एक वाडा अचानकपणे दुपारच्या सुमारास कोसळला. या वाड्यात काळे कुटुंबीय वास्तव्यास असल्याचे समजते. कुटुंबातील सदस्य जेवण करुन बाहेर येऊन ओट्यावर शेजा-यांशी गप्पा मारत बसले होते. काही वेळाने हे कुटुंब पुन्हा घरात गेले आणि त्याचवेळी अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने वाड्याचा धोकादायक झालेला भाग कोसळला. आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी एकच धाव घेतली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली. माहिती मिळताच शिंगाडातलाव येथील संपुर्ण वीस कर्मचारी हॅजमेट रेस्क्यू व्हॅन व देवदूत या अतीजलदत प्रतिसाद वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पंचवटी उपकेंद्र तसेच कोणार्कनगर उपविभागीय मुख्यालयातूनही रेस्क्यू व्हॅनसह जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहचले. लिफ्टिंग बॅग, इलेक्ट्रॅनिक कटर, सिमेंट कटर, वुडकटरच्या माध्यमातून बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे. अरुंद गल्लीबोळ, दाट लोकवस्ती, बघ्यांची झालेली गर्दी यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे. सुमारे दीड तासांत दोघा रहिवाशांना बाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आले आहे. अद्याप तीन रहिवाशी ढीगा-याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही रहिवाशांनी अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.