जुने नाशिक गजबले; सर्व रस्ते खुले; दैनंदिन व्यवहार सुरळीत २० दंगलखोर गजाआड
By अझहर शेख | Updated: August 17, 2024 18:22 IST2024-08-17T18:22:21+5:302024-08-17T18:22:38+5:30
जुने नाशिक परिसरातील जनजीवन शनिवारी पुर्वपदावर आल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले. ओळख पटलेल्या ४० दंगलखोरांचा पोलिसांच्या विविध पथकांकडून शोध सुरू आहे.

जुने नाशिक गजबले; सर्व रस्ते खुले; दैनंदिन व्यवहार सुरळीत २० दंगलखोर गजाआड
नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने नाशिक भागात शुक्रवारी (दि.१६) दुपारी अचानकपणे दोन गट समोरासमोर भीडल्याने दगडफेक होऊन दंगल उसळली होती. या दंगलप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.१७) दुपारी चार वाजेपर्यंत एकुण सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एकुण २०दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.
जुने नाशिक परिसरातील जनजीवन शनिवारी पुर्वपदावर आल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले. ओळख पटलेल्या ४० दंगलखोरांचा पोलिसांच्या विविध पथकांकडून शोध सुरू आहे.
बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराविरोधात ‘नाशिक बंद’चे आवाहन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी काही लोक दुचाकींवरून दुपारी दुधबाजार परिसरात आले. तेथे काही दुकाने सुरू असल्याने ती बंद करण्यासाठी बाइकवरून आलेल्या लोकांनी घोषणा दिल्या. यावेळी दोन गट समोरासमोर आले अन् तेथून दंगल उसळली. दुधबाजारातून सुरू झालेल्या दंगलीचे लोण क्षणात खडकाळी परिसर, जुनी तांबट गल्ली, डिंगरअळी, मोठी दर्गा रोड, बुधवारपेठ, पाटीलगल्लीचा काही भाग, काजीपुरा रोड आदी परिसर दगडफेकीच्या घटनांनी कमी-अधिक प्रमाणात प्रभावित झाला होता. पोलिसांनी रबरी गोळ्या व अश्रूधूराच्या सहा नळकांड्या फोडून दंगलखोरांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती. या सर्व भागात पोलिसांचा फौजफाटा शनिवारीही कायम ठेवण्यात आला होता.
सुसज्ज बंदोबस्ताचे ‘फिक्स पॉइंट’
दंगलप्रभावीत भागातील अंतर्गत गल्ल्याबोळांमध्ये पोलिसांचे ‘फिक्स पॉइंट’ तयार करण्यात आले आहेत. या फिक्स पॉइंटवर असलेले पोलिस संरक्षक ढाली, गॅसगन, काठ्या, रायफल्स, वॉकीटॉकी आदी सामुग्री घेऊन सज्ज असल्याचे दिसून आले. सहायक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षकांसह अंमलदार व राज्य राखीव दलाच्या जवानांचा फिक्स पॉइंटवरील बंदोबस्ता समावेश दिसून आला.