जुने नाशिक गावठाणचा क्लस्टरअंतर्गत होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:00 PM2018-02-08T21:00:53+5:302018-02-08T21:02:32+5:30
देवयानी फरांदे : मुंबईत झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता
नाशिक - मध्य विधानसभा मतदारसंघातील जुने नाशिक गावठाण परिसराचा क्लस्टर अंतर्गत (समूह विकास धोरण) विकास करण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली असून त्याबाबत नगरविकास विभागास त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना गुरुवारी (दि.८) मंत्रालयात झालेल्या बैठकीत अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली आहे.
नाशिक मध्य विधानसभा क्षेत्रातील जुने नाशिक भागाचा (गावठाणचा) विकास होण्यासाठी देवयानी फरांदे प्रयत्नशिल आहेत. जुने नाशिकच्या गावठाणच्या विकासावर चर्चा करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा तहकुब झालेली बैठक गुरुवारी (दि.८) मंत्रालयात झाली. यामध्ये गावठाण क्लस्टरसाठी नागपूरच्या धर्तीवर नाशिक शहरासाठीही स्वतंत्र नियमावली मंजूर करण्याचे मान्य करण्यात आले तसेच यासदंर्भात नगरविकास विभागामार्फत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. महापालिका आयुक्तांमार्फत गावठाणातील समुह विकासाबाबत स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याच्याही सुचना देण्यात आल्या. यामुळे कमी क्षेत्रातील दोन ते चार जागा मालक एकत्र येवून समुह विकास करु शकतील. या विषयाबाबत शासनामार्फत सकारात्मक धोरणाची मंजूरी नजीकच्या काळात दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होणा-या जमीन मालकांना वाढीव एफएसआय देण्याची तरतूद अंतर्भूत असणार आहे अथवा इतर विविध फायदे देण्यात येणार आहेत. यामुळे गावठाणचा विकास झपाटयाने होवू शकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितिन करीर, जलसंपदा सचिव च.अ.विराजदार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.बी.डी.पवार, मनोहर ठोंबरे, नगरविकासचे उपसचिव संजय सावजी, शं.त्र.जाधव, नियोजन व जलविज्ञानचे मुख्य अभियंता दि.रा.जोशी, मेरीचे महासंचालक राजेंद्र पवार तसेच व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन, सिडकाचे प्रशासक झोपे, मनपाचे शहर अभियंता उत्तम पवार, महापालिकेचे सहा.संचालक नगररचना आकाश बागुल आदी उपस्थित होते.
तुकाराम मुंढेंची उपस्थिती
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही उपस्थिती लावली. बुधवारी (दि.७) तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी मंत्रालयात झालेल्या या बैठकीला हजेरी लावत चर्चेत सहभाग नोंदविला. त्यामुळे जुने नाशिक गावठाणाच्या विकासाच्या चर्चेपासून मुंढे यांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे.