स्थायी समितीत जुन्या-नव्यांचा मेळ
By admin | Published: March 25, 2017 10:16 PM2017-03-25T22:16:01+5:302017-03-25T22:16:32+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली येत्या ३० मार्चला सकाळी ११ वाजता विशेष महासभा होणार आहे.
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली येत्या ३० मार्चला सकाळी ११ वाजता विशेष महासभा होणार आहे. स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, सत्ताधारी भाजपासह विरोधकांकडून स्थायीवर जुन्या-नव्यांचा मेळ साधला जाणार आहे. दरम्यान, तौलनिक संख्याबळ निश्चित करण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेत भाजपा- ६६, शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीवर १६ सदस्य नियुक्त करायचे आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी प्रत्येकी एक अपक्ष आपल्या सोबत घेत गटनोंदणी केलेली आहे, तर शिवसेनेची रिपाइंसोबत आघाडीची नोंदणी प्रक्रिया विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. त्यावर येत्या सोमवारी (दि. २७) निर्णय होणे अपेक्षित आहे. तौलनिक संख्याबळानुसार सद्यस्थितीत भाजपा- ९, शिवसेना- ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी एक याप्रमाणे १६ सदस्य स्थायीवर जाऊ शकतात, परंतु दि. २९ मार्चच्या आत विभागीय आयुक्तांनी सेनेसोबत रिपाइंची आघाडी नोंदणी मान्य केल्यास भाजपाचे संख्याबळ एकने घटू शकते. त्यामुळे समसमान ८-८ संख्याबळ होऊन चुरस निर्माण होईल. विभागीय आयुक्तांनी सेना- रिपाइंची आघाडी मान्य न केल्यास मात्र स्थायी समिती नियुक्ती प्रक्रियेच्या वेळी विरोधकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समितीत भाजपासह विरोधकांनी जुन्या-नव्यांचा मेळ घातला जाणार असून, काही ज्येष्ठांबरोबरच नव्या सदस्यांनाही संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
सभापतिपदासाठी दावेदारी
स्थायी समितीवर ८-८ संख्याबळ झाल्यास सभापतिपदासाठी निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी दावेदारांचीही संख्या विरोधकांमधून वाढण्याची शक्यता आहे. भाजपाकडून कॉँग्रेसमधून आलेले उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, मनसेतून आलेले शशिकांत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे, तर सेनेकडून स्वत: अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, सत्यभामा गाडेकर यांची नावे पुढे येऊ शकतात.