जुन्यांनी फसविले; नव्यांना वेळ द्या

By admin | Published: January 5, 2015 11:38 PM2015-01-05T23:38:10+5:302015-01-06T00:47:18+5:30

धनगर समाज आरक्षण : मान्यवरांच्या प्रतिक्रया ; ६५ वर्षांत हाती काहीच नाही

Old people cheated; Give time to navy | जुन्यांनी फसविले; नव्यांना वेळ द्या

जुन्यांनी फसविले; नव्यांना वेळ द्या

Next

नितीन काळेल - सातारा -धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, ही आमची ठाम भूमिका व मागणी आहे. त्यासाठी मागीलवर्षी आंदोलनही केले. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले. भाजपच्या नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. पंधरा दिवसांत आरक्षणाचा निर्णय होणार नाही. काँग्रेसने ६५ वर्षे काही न करता समाजाला फसविण्याचे काम केले, असा ठाम आरोप धनगर समाजातील मान्यवरांनी केला.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत महाधिवक्त्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली आहे.
या पर्श्वभूमीवर धनगर समाजातील काही मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजप व मित्रपक्षांच्या दोन्ही नवीन शासनाला थोडासा वेळ द्यावा लागेल, त्यांनी निर्णय न घेतल्यास पुढील भूमिका ठरवू, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘६५ वर्षांत काँग्रेसच्या शासनाने आम्हाला काही दिले नाही. बारामतीत उपोषण करूनही काही पदरी पडले नाही. केंद्रात व राज्यात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. हे सरकार आम्हाला नक्कीच आरक्षण देईल. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राजकारण करायचे आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मंत्री असतानाही या प्रश्नावर एकाच जातीची बाजू घेतली, हे दुर्दैव आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात काहीच अडचण नाही.’
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष टी.आर. गारळे म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणाच्या निर्णयासंबंधी १५ दिवसांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत वाट पाहावी लागेल. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा ते सर्व आमची कृती समितीच ठरवेल.’
साताऱ्यातील अहिल्या सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मारुती जानकर यांनी आक्रमकतेवर भर देत सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा व आपला शब्द पाळावा. नाहीतर भाजपचीही राष्ट्रवादीसारखी स्थिती करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही.’
रयत शिक्षण संस्थेच आजीव सदस्य आनंदराव डोंबाळे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे ठामपणे सांगितले. ते म्हणाले, ‘आरक्षणाबाबत लवकर निर्णय न झाल्यास साखळी आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. आम्ही आरक्षणाच्या निकषात बसत आहे. त्यामुळे आरक्षण हे आम्हाला मिळायलाच हवे,’ असेही त्यांनी निक्षून सांगितले. (प्रतिनिधी)


सर्व समाज एकत्र...
धनगर समाजाला एनटीच्या सवलतीचा फायदा होत नाही. आम्ही अनुसूचित जमातीचे आरक्षण मागत आहोत. धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी समाजातील सर्व घटक व सर्व पोटाजाती एकत्र आल्या आहेत. राजकीय नेतेही एकत्र आले आहेत. त्यामुळे शासनाला आता आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवता येणार नाही, असेही मान्यवरांनी सांगितले.



काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत भांडणे लावण्याचे काम केले. धनगर समाजाला आरक्षण देणे हा राजकीय नाहीतर भावनिक मुद्दा आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुकूल भूमिका आहे.
- महादेव जानकर,
अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

Web Title: Old people cheated; Give time to navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.