सायखेड्याचा जुना पूल धोकादायक
By admin | Published: May 9, 2017 01:25 AM2017-05-09T01:25:34+5:302017-05-09T01:25:53+5:30
निफाड : सायखेडा येथील गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचा विषय अतिशय गंभीर झाला असून, हा पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : सायखेडा येथील गेल्या ५२ वर्षांपासून उभ्या असलेल्या गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचा विषय अतिशय गंभीर झाला असून, या पुलाचे ९ पैकी ३ गाळे हे चक्क तरंगत्या अवस्थेत असून, हा पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आला आहे. त्यामुळेच या पुलावरून जड वाहनांना मागील वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. परंतु सायखेडा पोलिसांच्या पूर्ण दुर्लक्षामुळे या पुलावरून राजरोस जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, मोठी दुर्घटना घडल्यास यास कोणाला जबाबदार धरायचे, असा खडा सवाल गोदाकाठच्या जनतेने विचारला आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाने साडेतीन कोटी मंजूर केले आहेत.
विशेष म्हणजे, चांदोरी त्रिफुली येथे सायखेडा पुलावरून जड वाहनास बंदीचा फलकही लागलेला आहे. मात्र हा फलक ओलांडून जड वाहने या त्रिफुलीवरून प्रवेश करून पुलावरून निघून जातात. मग या वाहनांना सायखेडा पोलीस अडवत का नाही, त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, एवढी ढिलाई अचानक आली कशी, या पुलावरून बसेस जात नाहीत मग जड वाहनांना या पुलावरून परवानगी कशी, सायखेडा पोलिसांनी डोळ्यावर धृतराष्ट्रासारखी पट्टी बांधली आहे का, यासारखे असंख्य प्रश्न उभे राहत असून, यामुळे गोदावरी पट्ट्यातील गावांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी याप्रश्नी सायखेडा पोलिसांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
सायखेडा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर पूल बांधण्यास सन १९५८ साली प्रारंभ झाला आणि सन १९६५ साली या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. या पुलाची लांबी १५३ मीटर, तर रुंदी साडेसहा मीटर आहे. या पुलाला १६ मीटरचे एकूण नऊ गाळे आहेत. या पुलामुळे नाशिक, पिंपळगाव ब, निफाड, सिन्नर, संगमनेरकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. वर्षामागून वर्ष जात असताना, गोदावरीला सातत्याने पूर येत गेले. काळानुसार या पुलावरून तालुक्यातील वाहतूक वाढली. सिन्नर, शिर्डी, संगमनेर, पुणेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यात गोदावरीकिनारी असलेल्या २० ते २५ गावांत उसाचे क्षेत्र प्रचंड असल्याने उसाचे ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाळू, विटा, व इतर जड वाहनांची वाहतूक या पुलावरून वाढल्याने या पुलाची दमछाक होऊ लागली व त्यात गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा पडणारा प्रचंड दाब या सर्व कारणांमुळे हा पूल दिवसागणिक कमकुवत होऊ लागला. आता तर हा पूल मध्यभागी जास्त फुगलेला असून, दोन्ही टोकांना निमुळता आहे.
या पुलाच्या जागी नवीन पूल व्हावा म्हणून तसा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला होता. सायखेडकर याप्रश्नी मंत्र्यांना भेटले होते. परंतु या ठिकाणी नवीन पूल बांधण्याकामी जागेच्या प्रचंड अडचणी येत असल्याची बाब सरकारदरबारी निदर्शनास आली आहे. त्यामुळे हा जुना पूल अत्यंत चांगल्या बांधणीने दुरुस्त करून त्यास नवीन रूप देणे हाच पर्याय उभा राहताना दिसत असून, या पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर झाले असून, पावसाळ्यापूर्वी या कामाला प्रारंभ झाल्यास या पुलाचा धोका टळू शकतो.