त्या’ वृद्धाची तब्बल १७ तासांनंतर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 11:21 PM2016-02-20T23:21:48+5:302016-02-20T23:30:10+5:30
जिल्हा रुग्णालय : शौचकुपात अडकला होता पाय; रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड
नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर अर्धांगवायूच्या झटक्यामुळे उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाचा पाय शनिवारी (दि़२०) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शौचकुपात अडकला. अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल १७ तासांनी या रुग्णाचा पाय बाहेर काढण्यात यश आले़ या रुग्णाचे नाव समाधान श्रीपाद वानखेडे (५९, रा़ मलकापूर, जि़ बुलढाणा) असे असून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचे रुग्णाच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे़
शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वानखेडे एकटेच शौचासाठी गेले होते़ अर्धांगवायुमुळे शरीरावर नियंत्रण ठेवता येत नसल्याने ते शौचालयात पाय घसरून पडले़ यामध्ये त्यांचा डावा पाय शौचकुपामध्ये सुमारे दीड फूट आतमध्ये अडकून पडला़ त्यांनी आरडाओरड करून मदतीची याचनाही केली; मात्र रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याची माहिती मनोज जैन या सहकारी रुग्णाने दिली़
एका परिचारिकेने पहाटे पाच वाजेच्या सुमारास वॉर्डबॉयला सांगून वानखेडे यांचा अडकलेला पाय काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तसेच रुग्णालय प्रशासनास याबाबत माहिती दिली़ प्रशासनाने प्रथम सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यानंतर महापालिकेला माहिती कळविली़ घटनेनंतर तब्बल सहा तासांनी अर्थात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती रुग्णालयाने अग्निशमन दलास दिली़
अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी सव्वाअकरा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या शौचकुपाचे बांधकाम तोडून वानखेडे यांचा अडकलेला पाय सुखरूप बाहेर काढला़ शौचालयात असलेले स्टीलचे शौचकूप व अपुरी प्रकाशयोजना यामुळे जवानांना अडचणी येत होत्या़ अखेर सात तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना यश आले. या वृद्धाची सुटका करण्यामध्ये अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन, राजेंद्र बैरागी, डी. बी. गायकवाड, ए. टी. पाटील, डी. पी. परदेशी, डी. आर. लासुरे, अय्याज शेख, मुश्ताक पाटकर, जयेश संत्रस, जी. आर. पोटिंदे, पी. डी. शिंदे, एम. एस. बोधक यांनी विशेष परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)