Omicron Variant : चिंता वाढली! परदेशातून आलेल्या २८९ नागरिकांचा शोध सुरू; ओमायक्रॉनमुळे शासन सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:02 PM2021-12-07T17:02:33+5:302021-12-07T17:16:14+5:30
कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनमुळे शासन सतर्क झाले असून, विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी झाल्यानंतर ...
कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनमुळे शासन सतर्क झाले असून, विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी झाल्यानंतर तेथे निगेटिव्ह अहवाल आल्यासच संबंधिताना त्यांच्या शहरात जाऊ दिले जाते. विमानतळावर संंबंधित प्रवासी पॉझिटिव्ह आल्यास त्याला तेथेच गृहविलगीकरणात ठेवले जाते. दरम्यान, ११ देशांतून येणाऱ्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासन संकलित करून संबंधित स्थानिक यंत्रणांना पाठवत आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २८९ नागरिकांची यादी प्रशासनाला मिळाली आहे. त्यातील ६८ जणांची चाचणी घेण्यात आली असून, त्यातही ५५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अर्थात विदेशातून येणाऱ्यांची संख्या दररोजच वाढत असल्याने महापालिकेकडून नियमितपणे तपासणी सुरू आहे. त्यातही विदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळावर चाचणी केल्यानंतर ते निगेटिव्ह आले तरी सात दिवस झालेल्यांची पुन्हा स्थानिक पातळीवर चाचणी करण्यात येत आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
आफ्रिकेतून आलेल्या नगरसेविकेचा अहवाल निगेटिव्ह
नाशिक महापालिकेची एक नगरसेविका सहकुटुंब आफ्रिकेत जाऊन पुन्हा नाशिकमध्ये दाखल झाली आहे. संबंधित नगरसेविकेने आपला काेरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे महापालिकेला कळवले असले, तरी बुधवारी तिच्या कुटुंबांचीदेखील माहिती घेऊन चाचणी करण्यात येेणार आहे.