दहाव्या दिवशी नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर
By Suyog.joshi | Published: March 23, 2024 05:34 PM2024-03-23T17:34:22+5:302024-03-23T17:34:31+5:30
सकाळपासून नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर धावू लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक (सुयोग जोशी) : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसापासून संप पुकारलेल्या सिटिलिंक वाहक चालकांचा संप मिटल्याने शनिवारी सकाळपासून नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर धावू लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तपोवन डेपोतील १९६ बसेस डेपोतून बाहेर पडल्या तर दुसरीकडे नाशिकरोड डेपोतील ५४ बसेसची सेवा मात्र प्रारंभापासून सुरूच होती. नाशिककरांना चांगच्या दर्जाची प्रवासी सेवा देऊनही केवळ वाहक पुरवठादार ‘मॅक्स डिटेक्टिव्ह अॅन्ड सेक्युरीटीज’ या दिल्लीस्थित ठेकेदार कंपनीच्या आठमुठेपणामुळे सिटीलिंकला संपाला सामोरे जावे लागले होते.
ठेकेदाराकडून नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा न करणे, दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई अशा विविध कारणांमुळे वाहकांनी आतापर्यंत नऊ वेळा संप पुकारला. ७ मार्च पर्यंत डिसेंबरचे उर्वरीत वेतन देण्याचे आश्वासन ठेकेदाराने पाळले नाही,त्यामुळे वाहकांनी संप सुरू केला होता.
संप काळात प्रवाशांचे हाल -
रिक्षा व खासगी वाहनधारकांनी संपाचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करून प्रवाशांची लुट केली. प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे चांगली सेवा देऊनही सिटीलिंकला नालस्ती सहन करावी लागली. त्यामुळे संप काळात पुन्हा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एक कोटींचा फटका -
संप काळात सिटी लिंकच्या १८०० फेऱ्या रद्द झाल्याने मनपाला एक कोटी रुपयांचा फटका बसला. पंचवटीतील तपोवन डेपो येथील बसेसना वाहक पुरविण्याचा ठेका मे. मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटी या कंपनीला देण्यात आलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या कंपनीच्या वाहकांनी गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ पासून संप पुकारला होता. नियमित वेतन, पीएफ, ईएसआयसी व रजेचे पैसे अकाऊंटला जमा करणे, इन्क्रिमेंट, बोनस अशा मागण्यांचा समावेश होता.