देवळ्यात चार सोसायट्यांसाठी अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 10:52 PM2022-03-27T22:52:05+5:302022-03-27T22:53:11+5:30
देवळा : तालुक्यातील वाजगाव, खुंटेवाडी, वाखारवाडी व डोंगरगाव ह्या चार विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल झाले असून, वाजगाव सोसायटीसाठी सर्वाधिक ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात वाखारवाडी ३३, खुंटेवाडी ३२, डोंगरगाव २९ अर्जांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या गावांमध्ये प्रयत्न सुरू आहेत.

दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थिक गर्तेत सापडली होती. यामुळे तालुक्याच्या प्रत्येक गावाचा आर्थिक कणा असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्या डबघाईस आल्या. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या या सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली, त्यातच कोरोनामुळे वसुली ठप्प झाल्यामुळे त्या अधिकच डबघाईस गेल्या. यास वेळेवर कर्ज फेड न करणारे कर्जदार जेवढे जबाबदार आहेत तेवढीच जिल्हा बँक व सोसायटी प्रशासन यांनी कर्जवाटपात केलेली अनियमितता, संस्थेचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांनी केलेले दुर्लक्षदेखील तेवढेच जबाबदार आहे.
यामुळे नियमित कर्ज फेड करणाऱ्या सभासदांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. ह्या निवडणुकीत थकबाकीदार सभासद मतदानापासून वंचित राहणार असल्यामुळे प्रत्येक सोसायटीत मतदारांची संख्या घटली आहे. सहकार पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी गावातील गटतट, भाऊबंदकी व राजकीय मतभेद दूर ठेवत सोसायटीच्या संचालकपदी अभ्यासू व योग्य व्यक्तींना संधी मिळाली पाहिजे, अशी चर्चा सोसायटी सभासदांमध्ये सुरू झाली आहे.
सोमवारी (दि. २८) नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. २९ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असून, दि. १३ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्हांसह प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ ह्या वेळेत मतदान होणार असून, मतदानानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.