बलिप्रतिपदेनिमित्त पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी; ढोल ताशांचा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 09:21 PM2023-11-14T21:21:03+5:302023-11-14T21:21:03+5:30
दिवाळी सणानंतर अर्थात (पाडवा) बलिप्रतिपदेला नाशिकमध्ये विशेषतः पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांपासूनची पूर्वापार परंपरा आहे.
संदीप झिरवाळ -
नाशिक - बलिप्रतिपदा (पाडवा) निमित्त पंचवटीत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मंगळवारी (दि.14) सायंकाळी ढोल ताशांचा गजर आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करून रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दुग्ध व्यवसायिक तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवाळी सणानंतर अर्थात (पाडवा) बलिप्रतिपदेला नाशिकमध्ये विशेषतः पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांपासूनची पूर्वापार परंपरा आहे.
मंगळवारी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात फुलांची व लाल गुलालाची उधळण करत फटाके वाजवून गोठे धारक दुग्ध व्यवसायिकांनी सुरुवातीला रेड्यांचे विधिवत पूजन करत त्यांच्या गळ्यात हार माळ घातल्या त्यानंतर मिरवनजकीला प्रारंभ करण्यात आला.
वेगवेगळ्या भागातून निघालेल्या मिरवणूक दिंडोरीरोड येथे असलेल्या म्हसोबा महाराज मंदिर, गंगाघाट भागात नेऊन म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी आणल्याने रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती.
रेडयांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर जय श्रीराम, हिंदू, तर काहींनी स्वतःच्या डेअरीचे व आडनाव असे संदेश लिखित केले होते. रेडयांच्या पाठीवर काढलेले देवदेवता चित्र, विविध संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
मंगळवारी सायंकाळी गोठेधारक आणि दुग्ध व्यवसायिकांनी रेडयांची सजावट पुजन व आरती केल्यावर सवाद्य मिरवणूक सुरू झाली.
पंचवटी परिसरातील गजानन चौक, नागचौक, गणेशवाडी, गंगाघाट, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, हिरावाडी, दत्तनगर, आडगाव नाका, पेठरोड, आदिंसह परिसरातील अनेक गोठेधारकांनी रेड्यांची मिरवणूक काढली होती.
म्हसोबा महाराज मंदिर जवळ रात्री भाविकांनी मोठी गर्दी केल्याने
वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मिरवणूकीच्या अग्रभागी विद्युत रोषणाई केलेले वाहन व ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळण करून सहभागी भाविकांनी वाद्यावर ठेका धरला होता. पंचवटी कारंजा, गंगाघाट, दिंडोरीरोड, पेठफाटा, पेठरोड येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.