नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गड, आज अलंकारांची सवाद्य मिरवणूक; खासगी वाहनांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:17 AM2022-09-26T05:17:41+5:302022-09-26T05:18:14+5:30

प्रशासकीय यंत्रणेबरोबर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृंगी गड प्रशासन तसेच ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.

On the occasion of Navratri festival Saptshringi gadh ready for destival Ban on private vehicles | नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गड, आज अलंकारांची सवाद्य मिरवणूक; खासगी वाहनांना बंदी

नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गड, आज अलंकारांची सवाद्य मिरवणूक; खासगी वाहनांना बंदी

Next

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दि. २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व सप्तशृंगी गड प्रशासन तसेच ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.

सोमवारी (दि. २६) सकाळी सात वाजता सप्तशृंगी देवी न्यासाच्या कार्यालयात श्री भगवतीच्या अलंकारांची विधिवत पूजा होऊन अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. देवीची पंचामृत महापूजा यजमानांच्या हस्ते होणार असून, प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी सपत्नीक तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते महापूजा विधी होणार आहे. घटस्थापना करण्यासाठी भाविकांना परतीच्या पायऱ्यांजवळील भक्तांगण हॉल व होमकुंडाजवळ ट्रस्टने जागा उपलब्ध करून दिली आहे. दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर यंदा लाखो भाविक गडावर येण्याची शक्यता आहे.

देवीच्या मूर्तीचे नुकतेच संवर्धन करण्यात आल्याने मूळ रूपातील देवी दर्शनासाठी भाविक आतूर झाले असून, त्यानिमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक, पोलीस दल, डिझास्टर मॅनेजमेंट, महिला व पुरुष होमगार्ड आदी नियोजन केले आहे. बाऱ्यांवर नियंत्रणासाठी पहिल्या पायरीजवळील वेटिंग हॉलचे नियोजन असून, संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. भाविकांना दर्शनासाठी २४ तास मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चार डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. तेल वाहण्यासाठी पहिल्या पायरीजवळील दीपमाळीची व्यवस्था केली असून, पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई, भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी १५ ठिकाणी बाऱ्यांचे नियोजन, मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने बंदूकधारी वीस सुरक्षारक्षक, भाविकांना राहण्यासाठी २०० खोल्या, भोजनालय व्यवस्था, धर्मार्थ दवाखाना आदी नियोजन पूर्ण झाले आहे. उद्यापासून खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली असून, रसवंती, खेळणी, बांगड्या, पेढेप्रसाद व सौंदर्य प्रसाधने अशा अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटून सज्ज ठेवली आहेत.

Web Title: On the occasion of Navratri festival Saptshringi gadh ready for destival Ban on private vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.