हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला
By अझहर शेख | Published: March 6, 2024 04:42 PM2024-03-06T16:42:45+5:302024-03-06T16:42:53+5:30
सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले.
नाशिक : सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. खिरेश्वरचा बाळू हा हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा तारा होता, अशी भावना नाशिक, पुण्यातील ट्रेकर्स मंडळीसह वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
अहमदनगर, पुणे, ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेल्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी विविध वाटा आहेत; मात्र खिरेश्वर मार्ग आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई गावातून जाणारा मार्ग ट्रेकर्सच्या पसंतीचा आहे. बाळू हा खिरेश्वरमार्गे पर्यटकांना गडभ्रमंती घडवून आणायचा. त्याच्याकडे असलेल्या इत्यंभूत माहितीचा खजिनाही तो रिता करत गडासह परिसरातील अन्य डोंगर, गड, धबधबे, जंगल, देवराया, जैवविविधतेबाबत इत्यंभूत माहिती दंतकथा तो सांगत असे. निर्व्यसनी बाळूला दुर्धर आजाराने वर्षभरापूर्वी ग्रासले. यामुळे त्याचा मंगळवारी (दि.५) अकाली मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
त्या पाच मित्रांसाठी बाळू ठरला होता ‘देवदूत’
मागीलवर्षी ऑगस्टमध्ये पावसाळ्यात गडावर पुण्याच्या हौशी ट्रेकर्सच्या सहाजणांचा एक ग्रुप वाट चुकला होता. दाट धुके, धो-धो कोसळणारा पाऊस अन् झालेल्या अंधारामुळे त्यांना गडावरून खाली उतरता आले नव्हते अन् ते भरकटले होते. थंडी आणि उपासमारीमुळे एकाचा मृत्यूही झाला होता. बाळू रेंगडे याला दुसऱ्या दिवशी जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा बाळूने कसलीही तमा न बाळगता त्या भरकटलेल्या लोकांच्या शोधासाठी गड चढायला सुरुवात केली. एका मृतदेहाजवळ पाच लोक बसलेले त्याला दिसले. त्यांच्यात एक शाळकरी मुलगाही होता. गावकरी, वन्यजीव विभागाला त्याने माहिती दिली. आपत्कालीन मदत मागविली. भरपावसात जुन्नर रेस्क्यू टीम, वन्यजीव विभाग, पोलिस, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने बाळूने सलग दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन राबवून पाचजणांचे प्राण वाचविले होते. त्यांच्यासाठी तो संकटमोचक ठरला. होता. वन्यजीव विभागाचे तत्कालीन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, राजूर वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे यांनी बाळूच्या धाडसाचे कौतुक करत त्याला रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.
बाळूची उणीव नेहमीच भासणार आहे. त्याच्या अकाली निधनाने वन-वन्यजीव विभागाने मोठा दुवा गमावला आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य राजूर वनपरिक्षेत्र व नाशिक वन्यजीव विभाग त्याच्या कुटुंबीयांच्या नेहमीच पाठीशी आहे.
दत्तात्रय पडवळे,
प्रभारी सहायक वनसंरक्षक
हरिश्चंद्रगडासह सर्वच आजूबाजूच्या गडांची इत्यंभूत माहिती ठेवणारा उत्तम संवादकौशल्य अवगत असलेला तो गाइड होता. वन्यजीव विभागाला बाळूची नेहमीच साथ लाभली. तो वन्यजीव विभागासह पर्यटकांचा विश्वासाचा हक्काचा माणूस होता.
गणेश रणदिवे,
विभागीय वनाधिकारी, नाशिक
बाळू रेंगडे हा उत्तम अभ्यासू गाइड तर होताच मात्र माझ्या लहान भावासारखा होता. त्याच्यामुळेच मला सह्याद्रीला जवळून ओळखता आले. प्रचंड स्वाभिमानी, निस्वार्थी बाळू आयुष्यभर सह्याद्री आणि तेथे येणाऱ्या पर्यटकांवर जीवापाड प्रेम करत राहिला. अखेरचा श्वास घेतानाही त्याने ते प्रेम ‘मला कोकणकड्याला डोळे मिटण्याअगोदर घट्ट मिठी मारायची आहे,’ अशा शब्दांतून व्यक्त केले.
ओंकार ओक,
ट्रेकर्स, रेस्क्यू समन्वयक, पुणे
बाळू हा हरहुन्नरी वाटाड्या. कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होणारा. येणाऱ्या कोणत्याही ट्रेकर्सशी मैत्री करणारा होता. हरिश्चंद्रगड हा त्याचा ‘वीक पॉइंट’ होता. या परिसरात कुठेही दुर्घटना घडली तर बाळू असेल तेथून धावत यायचा. कुठलीही अपेक्षा न ठेवता. तो पहिला मदतीचा हात पुढे करायचा. त्याच्या निधनाने सह्याद्रीची मोठी हानी झाली आहे.
संजय अमृतकर,
गिर्यारोहक, नाशिक