कामे वाटपाचा पुन्हा एकदा ‘यळकोट’, अभियंत्याला ठेकेदाराची धमकी
By admin | Published: August 9, 2016 12:37 AM2016-08-09T00:37:31+5:302016-08-09T00:37:39+5:30
अध्यक्षांची दांडी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही पोबारा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीच्या बैठकांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडतच असून, १ आॅगस्टच्या तहकूब करण्यात आलेल्या येवला व नाशिक तालुक्यातील कामे वाटपावरून पुन्हा एकदा सोमवारी (दि.८) गोंधळ उडाला.
जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीची १ आॅगस्ट रोजी तहकूब करण्यात आलेली बैठक सोमवारी पुन्हा घेण्यात आली. बैठकीत येवला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या सेस निधीतून सुमारे ५२ कामांचे वाटप असताना आणि त्यासाठी निफाड व येवला तालुक्यांतील काही मजूर सहकारी संस्थांनी दावा केल्याने सदस्य आणि मजूर सहकारी संस्थांचालक यांच्यात वाद होण्याची शक्यता असल्याने काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी बैठकीस दांडी मारली. त्यामुळे बैठकीचे अध्यक्षपद हे सचिव कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी स्वीकारले. त्यानंतर येवला तालुक्यातील कामांसाठी रितसर चिठ्ठ्या काढून कामांचे वाटप करण्यात आल्याचे कळते, तर नाशिक तालुक्यातील दहा कामांसाठी प्रत्येकी नऊ अर्ज आल्याने या कामांच्याही चिठ्ठ्या काढून वाटप करण्यात आले. त्यात काही वेळ सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची तू-तू मै-मै झाली. त्यात एका सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कामांबाबतचे अर्ज मागे घेण्यावरून एका ठेकेदाराच्या सुपुत्राने हात पाय तोडण्याचे धमकावले. त्यामुळे बैठक वादळी झाली. अखेर सर्व कामांचे वाटप बांधकाम विभागाने करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)