चेहडी येथे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसह एकाचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:26 PM2023-09-28T22:26:07+5:302023-09-28T22:26:51+5:30
नाशिकरोड परिसरामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात व शांततेत गुरुवारी सकाळपासून श्री लाडक्या गणरायाचे विसर्जन सुरू होते.
- मनोज मालपाणी
नाशिकरोड - चेहेडी पंपिग येथे दोन युवक वडनेरगाव वालदेवी नदीपात्रात श्री गणरायाचे विसर्जन करताना दुर्दैवाने बुडून मरण पावले. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकरोड परिसरामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात व शांततेत गुरुवारी सकाळपासून श्री लाडक्या गणरायाचे विसर्जन सुरू होते. वालदेवी व दारणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने चेहेडी पंपिंग बंधाऱ्याचे दोन दरवाजे खोलण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चेहेडी पंपिग येथे चेहेडी शिव इम्पायर मार्वल इमारतीचा सार्वजनिक मंडळाचा गणपती विसर्जनासाठी परिसरातील सर्व रहिवासी गेले होते.
यावेळी रोहित वैद्यनाथ नागरगोजे वय 22 रा. हरी संस्कृती खर्जुल मळा, प्रसाद सुनील दराडे वय 18 हे दोघे श्री गणपती विसर्जन करत असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मरण पावले. उपस्थित भाविकांनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धावपळ करून बंधाऱ्याच्या परिसरातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. रोहित नागरगोजे हा सामनगाव रोड येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर प्रसाद दराडे हा बिटको महाविद्यालयात बारावी ला शिकत होता.
दुसऱ्या घटनेत वडनेर गाव येथे विवाहित युवक हेमंत कैलास सातपुते वय 35 हा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीपात्रात श्री विसर्जनासाठी गेला असता तो देखील बुडून मृत पावला. सायंकाळी उशिरापर्यंत अंधारात नदीपात्रात त्याचा शोध घेण्यात आला परंतु मृतदेह मिळून आल्याने शोध कार्य थांबविले. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात येणार आहे.