रोजंदारी कर्मचाऱ्याकडून महाराष्ट्र बँकेला दीड कोटींचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 01:45 AM2022-07-14T01:45:17+5:302022-07-14T01:45:43+5:30
देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेत रोजंदारीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने गैरफायदा घेऊन सुमारे १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर, ता. देवळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा/भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेत रोजंदारीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने गैरफायदा घेऊन सुमारे १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर, ता. देवळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भगवान ज्ञानदेव आहेर हा २०१६ पासून ते ८ जुलै २०२२ पावेतो रोजंदारीवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याने बँक खातेदारांचा विश्वास संपादन करून गैरफायदा घेत बँकेतील जवळपास ३२ खातेदारांच्या खात्यावरील रक्कम विविधप्रकारे घेऊन बँकेच्या सही-शिक्का असलेल्या स्वतः लिहिलेल्या मुदत ठेवीच्या बनावट पावत्या तयार केल्या. त्या बँक ठेवीदारांना त्यांच्याकडील रक्कम स्वीकारून अदा केल्या व सदरची रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जवळपास १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपये एवढी रक्कम बाळगून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, संशयित आरोपीच्या विरोधात अफ़रातफ़रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित संशयित फरार असून, देवळा पोलिसांची दोन पथके त्याच्या शोधार्थ पाठविली आहेत. त्याला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. आर. देवरे करीत आहेत.
खातेदारांशी अधिकाऱ्यांचा संवाद
मालेगाव येथील बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीराम भोर बुधवारी (दि.१३) दिवसभर भऊर येथे तळ ठोकून ग्राहकांच्या तक्रारी समजून घेत होते. बँक खातेदारांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या व्यवहाराची शहानिशा करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संततधार पाऊस सुरू असतानाही क्षेत्रीय प्रबंधक यांच्याकडे तक्रार देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. झालेली गर्दी पाहता, या अपहाराची व्याप्ती अधिक मोठी असल्याचे दिसून येत आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात अ्राला होता.
मी फिक्स डिपॉझिट करण्यासाठी ४ लाखांचा धनादेश बँकेत संबंधित कर्मचारी भगवान आहेर यांच्याकडे दिला होता. माझ्या बँक खात्यातून त्याचदिवशी धनादेश पास झाला. भगवान याने मला फिक्स डिपॉझिट केल्याची पावतीदेखील त्याच्या हस्ताक्षरात लिहून दिली आहे. मात्र बँकेत तपासणी केली असता, बँकेत माझे फिक्स फिक्स डिपॉझिट आढळून आले नाही. त्यामुळे माझी चार लाखांची फसवणूक झाली आहे.
- सविता रवींद्र शिंदे, बँक खातेदार, वरवंडी
पीक कर्ज भरण्यासाठी भगवान नामक कर्मचारी यांनी १ लाख ९८ हजार ८०० रुपयांचा चेक घेतला. बँकेत तपासणी केली असता, चेक पास झाला आहे; मात्र माझे पीक कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे.
- रविकुमार केवळ पवार, बँक खातेदा, भऊर
कोट...
ग्रामीण भागात काबाडकष्ट करून, पोटाला चिमटा देत आपली पुंजी जमा करून बँकेत ठेवतात. त्यालाही सुरक्षितता नाही. बँकेतून अपहार झालेली रक्कम संबंधित खातेदारांना तात्काळ मिळावी.
- पंडितराव निकम, लोहोणेर
आमदारांकडून चौकशीची मागणी
बँक ऑफ महाराष्ट्र, भऊर, ता.देवळा येथील कर्मचाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेत सदर घटनेची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली.