नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव
By अझहर शेख | Published: June 22, 2023 06:43 PM2023-06-22T18:43:26+5:302023-06-22T18:43:52+5:30
पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत.
नाशिक : पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत. आठवडाभरात तहानलेल्या गावांचा आकडा ७१वरून ८२वर पोहचला आहे. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ८२ लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मान्सूनने लवकर सलामी न दिल्यास हा आकडा अधिक गंभीर रूप धारण करण्याची श्यक्यता आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची चिंता अधिक वाढली आहे.
जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची धग आता वेगाने वाढू लागली आहे. वरुणराजाची कृपादृष्टी होत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२ गावांची तहान टँकरद्वारे भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आकडा वाढण्याची श्यक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी वाढीव जलस्त्रोतांचा शोध घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.
तहानलेली गावे, वाडीवस्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेगाने वाढणारे टंचाईग्रस्त गावे, वाडीवस्ती यामुळे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
६३ टँकर १७३ फेऱ्या
नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकुण ६३ टँकर रस्त्यावर धावत आहेत. या टँकरच्या एकुण १७३ फेऱ्या सध्या सुरू असून टंचाईग्रस्त गावे, वाड्यांवरील लोकांची तहान भागविली जात आहे. वेगाने टँकरची संख्या व फेऱ्या वाढविण्याची गरज भासू लागली आहे. बुधवारी टँकरच्या फेऱ्या १६५ होत्या; मात्र गुरूवारी (दि.२२) हा आकडा १७३वर पोहचला. सर्वाधिक २२ टँकर येवला तालुक्यात सुरू आहे.