शहरात कोरोनाबाधितांचे दीड शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:46 AM2020-05-29T00:46:34+5:302020-05-29T00:48:00+5:30
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला गुरुवारी (दि.२८) बाधितांचा आकडा दीडशे पार गेला आहे. गुरुवारी दिवसभरात एकूण चौदा बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे यात नाशिकरोड येथील एका मोठ्या लोकप्रतिनिधीचादेखील समावेश आहे. त्यांच्या कुटुंबात एकूण चार जणांना लागण झाली आहे. बहुतांश बाधित हे यापूर्वीच्या रु ग्णांच्या संपर्कातील आहेत, तर अन्य तीन नवे रुग्ण आहेत.
नाशिक : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला गुरुवारी (दि.२८) बाधितांचा आकडा दीडशे पार गेला आहे. गुरुवारी दिवसभरात एकूण चौदा बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे यात नाशिकरोड येथील एका मोठ्या लोकप्रतिनिधीचादेखील समावेश आहे. त्यांच्या कुटुंबात एकूण चार जणांना लागण झाली आहे. बहुतांश बाधित हे यापूर्वीच्या रु ग्णांच्या संपर्कातील आहेत, तर अन्य तीन नवे रुग्ण आहेत.
गुरुवारी आढळलेल्या रुग्णात नाशिकरोड येथील लोकप्रतिनिधीचा समावेश आहे. संबंधित लोकप्रतिनिधी कुटुंबासह मुंबई येथे एका आप्तेष्टाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर बुधवारी (दि. २७) त्यांची बहीण आणि तिच्या मुलीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर गुरुवारी लोकप्रतिनिधी आणि बहिणीच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अन्य अनेक रुग्ण यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तींच्याच संपर्कातील आहे. कामटवाडे येथे पाच कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, ते सर्वजण विसे मळ्यातील मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील आहेत. म्हणजेच त्या कर्मचाºयाच्या भावाचे कुटुंबीय आहेत. याशिवाय पखालरोड येथे यापूर्वी बाधित रुग्णाच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच जुने नाशिकमधील दूधबाजार येथील रहिवासी परंतु पंचवटीतील एका औषधांच्या दुकानात काम करणारा कर्मचाºयासदेखील संसर्ग झाल्याचे आढळले आहे.
जत्रा हॉटेल परिसरातील बाधितांच्या संपर्कातील एक त्याचप्रमाणे इंदिरानगर येथील रथचक्र चौकातील रहिवासी पॉझिटिव्ह आला आहे, तर एका खासगी रुग्णालयात उपचार घेणारा युवक आणि मुमताजनगर भागात राहणारी यापूर्वीच्या बाधितांशी संबंधित एक महिलाही पॉझिटिव्ह आली आहे. नव्या बाधितांमुळे शहरातील बाधितांचा आकडा १५२ झाला आहे.