प्रतिभूती मुद्रणालयाकडून तीन रुग्णालयांना दीड कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:25+5:302021-04-28T04:16:25+5:30
नाशिकरोड : येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाने सामाजिक बांधिलकी म्हणून सिन्नर, इगतपुरी, आणि देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड या तीन रुग्णालयांमध्ये ...
नाशिकरोड : येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाने सामाजिक बांधिलकी म्हणून सिन्नर, इगतपुरी, आणि देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड या तीन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी एकूण १ कोटी ५९ लाख ३० हजाराचा निधी मंजूर केला आहे. तिन्ही रुग्णालयांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये प्रकल्पासाठी देण्यात येणार आहेत.
खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रेस व्यवस्थापनाला याबाबत पत्र देऊन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांनी याबाबत मुद्रणालय महामंडळाकडे पाठपुरावा केला. प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक दुर्गा प्रसाद यांनी मंजुरीचे पत्र पाठवले. त्यांच्यासह महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्रा घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजयकुमार अग्रवाल, आयएसपीचे मुख्य व्यवस्थापक सुधीरकुमार साह यांचे मजदूर संघाने आभार मानले.
प्रेसने सीएसआरमधून गतवर्षी एक कोटीचा निधी जिल्हा रुग्णालयाला दिला होता. सिन्नरच्या ग्रंथालयासाठी आयएसपीने साठ लाख तर घोटीच्या ग्रंथालयासाठी प्रेसने साठ लाख रुपये दिले होते. अंध विद्यार्थ्यांना स्कूल बस दिल्या होत्या. त्र्यंबकेश्वर आत्महत्या ग्रस्त शेतकरी मुलांच्या आश्रमाला मदत केली होती. दुष्काळग्रस्त, महापूरग्रस्त तसेच केरळ सुनामीग्रस्तांसाठी कामगारांनी एक दिवसाचे वेतन दिले होते.
गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. नाशिकमध्ये सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयात मोठी गर्दी होत आहे. अनेकदा ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यामुळे रुग्ण दगावत आहेत. याची दखल घेत प्रेसच्या सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदायित्व निधी) देवळाली कॅन्टोन्मेन्ट बोर्ड, सिन्नर, इगतपुरीतील सरकारी रुग्णालायांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी मदत करण्याची विनंती केली. त्यास प्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला.