हार्डवेअरच्या दुकानात आढळली दीड फूट लांबीची घोरपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 05:22 PM2019-09-25T17:22:48+5:302019-09-25T17:28:54+5:30
बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली
नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड हे वन्यजीव आढळून आले. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले.
शहराच्या मध्यवर्ती भागात वन्यजीव येण्याचे प्रमाण अलिकडे वाढू लागले आहे. शहराजवळची वृक्षराजींचा आधिवास दिवसेंदिवस कमी होत चालला असून नैसर्गिक ठिकाणांवरही नागरिकांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. परिणामी वन्यजीव अनेकदा वाट चुकून शहरी भागात येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आठवडाभरापूर्वी चार वानर शहराच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरात भटकंती करताना आढळून आले होते. महिनाभरापुर्वी शरणपूररोड येथील एका व्यावसायिक संकुलाच्या तळ मजल्यातून घोरपडीचे लहान पिल्लू वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ पश्चिम नाशिकचे वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, राजेंद्र ठाकरे, इको-एको वन्यजीवप्रेमी संघटनेचे वैभव कुलकर्णी, सुखदा गायधनी आदिंनी हार्डवेअरच्या दुकानात पोहचून घोरपड सुरक्षितपणे ताब्यात घेतली. घोरपड संपुर्णत: तंदरूस्त असल्यामुळे तीला तत्काळ सायंकाळी नैसर्गिक अधिवासात वन कर्मचाऱ्यांकडून मुक्त करण्यात आले.