आदिवासी पट्ट्यात पंधरा दिवसात दीडशे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:42+5:302021-05-11T04:15:42+5:30
बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यासह देशी भागातील आदिवासी व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्ती गैरसमजातून लसीकरणास विरोध करीत आहेत. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव ...
बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यासह देशी भागातील आदिवासी व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्ती गैरसमजातून लसीकरणास विरोध करीत आहेत. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्या भागातील नागरिक बधितांना वाळीत टाकत आहेत. वाळीत टाकण्याच्या भीतीने उपचाराअभावी मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी पंचायत समिती सभागृहात आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती. बैठकीत आमदार बोरसे यांच्यासह पंचायत समितीच्या उपसभापती ज्योति अहिरे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे ,सहायक गटविकास अधिकारी कथेपुरी ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत अहिरराव ,बिंदुशेठ शर्मा यांच्यासह विस्तार अधिकारी ,सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पहिल्या लाटेत आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाने बेफिकिरी न बाळगता नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला नाही . दुसऱ्या लाटेत मात्र कोरोना चाचणी आणि लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाल्यामुळे हा परिसर हॉटस्पॉट झाला आहे. हा गैरसमज काढण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याबद्दल आमदार यांनी नाराजी व्यक्त केली.
------------------------------------
इन्फो
रोटेशननुसार लसीकरण
आमदार बोरसे यांनी लसीकरण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक आठवड्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने रोटेशननुसार लसीकरण करण्यासोबतच उपलब्ध लसीनुसार प्रतीक्षा यादीसुद्धा लावण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरराव यांनी यावेळी सांगितले, तसेच पश्चिम आदिवासी पट्टा व देशी भागातील आदिवासी वस्तीत कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी एक फिरते आरोग्य पथक ठेवण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम सरपंच, सदस्य ,पोलीस पाटील ,सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांना लसीकरण करण्यात येईल, त्यानंतर त्यांच्या घरातील सदस्यांचे लसीकरण केले जाईल, असेही डॉ. अहिरराव यांनी स्पष्ट केले.