साडेचार लाख बालकांना पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:26 AM2020-01-18T01:26:35+5:302020-01-18T01:28:02+5:30
पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालू वर्षातील पहिली पल्स पोलिओ मोहीम येत्या रविवारी (दि.१९) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या मोहिमेदरम्यान सुमारे साडेचार लाख बालकांना डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी त्यासाठी जागोजागी बूथ उभारण्यात येणार असून, त्यानंतर मंगळवारपासून (दि.२१) घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांमार्फत बालकांना डोस दिला जाणार आहे.
नाशिक : पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालू वर्षातील पहिली पल्स पोलिओ मोहीम येत्या रविवारी (दि.१९) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या मोहिमेदरम्यान सुमारे साडेचार लाख बालकांना डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी त्यासाठी जागोजागी बूथ उभारण्यात येणार असून, त्यानंतर मंगळवारपासून
(दि.२१) घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांमार्फत बालकांना डोस दिला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जगजागृती केली जात आहे. गावोगावी दवंड्या पिटण्याबरोबरच भिंती रंगविल्या जात आहेत.
राज्यात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे असून, त्यात पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पोलिओ निर्मूलन टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत असून, त्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच मोहिमेची जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी गावागावात जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून, त्यात गावांमध्ये दवंडी देणे, भिंतीवर म्हणी लिहिणे, पोस्टर, बॅनर, ध्वनिक्षेपकावरून माहिती दिली जात आहे. पल्स पोलिओ मोहिमेच्या आदल्या दिवशी शनिवारी सकाळच्या सत्रामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक गावांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेवर मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक अनंत पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश नांदापूरकर, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र निकम आदी लक्ष ठेवून आहेत.
जिल्हाभरात ३५६१ बूथ उभारणार
नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात एकूण ४,५४,२०१ लाभार्थी बालके असून, त्यांना डोस देण्यासाठी ३५६१ बुथचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ९१६६ कर्मचारी बूथवर काम करणार आहेत. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी ७२६ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, २१ जानेवारीपासून ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस ही मोहीम राबवून घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना लस पाजण्यात येणार आहे.