दीड हजार विद्यार्थी सापडले शाळाबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:43+5:302021-03-24T04:13:43+5:30
नाशिक जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातील गावागावात शिक्षकांकरवी १ ते १० मार्च दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. त्यात कधीही शाळेत ...
नाशिक जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातील गावागावात शिक्षकांकरवी १ ते १० मार्च दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. त्यात कधीही शाळेत न गेलेले विद्यार्थी, तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ शाळेत गैरहजर राहिलेले विद्यार्थी व सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी असे वर्गीकरण करण्यात आले होते. शिक्षकांनी घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे दीड हजार विद्यार्थी शाळा बाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
------------------------
४० टक्के विद्यार्थिनींचा समावेश
शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेत सर्वाधिक प्रमाण विद्यार्थिनींचे असून, त्यात अनेक कारणे सांगितली जातात. विशेष करून आई किंवा वडील या दोघांपैकी कोणीही एक नसणे त्यामुळे कौटुंबीक जबाबदारी मुलींवर येऊन पडल्यामुळे त्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात ४०५ मुली शाळा बाह्य सापडल्या आहेत.
-----------------
अकरा हजार शिक्षकांकडून सर्व्हे
नाशिक जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांतील प्रत्येक गावात राबविण्यात आलेल्या या शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहिमेत जिल्हा परिषदेच्या सुमारे अकरा हजार शिक्षकांची मदत घेण्यात आली.
-----------
शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहीमेत आढळलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र भरून घेण्यात आले आहे. सध्या शळा बंद असल्यामुळे त्यांना प्रवेश झालेला नसला तरी, शाळा सुरू होताच त्यांना नजिकच्या शाळेत प्रवेश देवून शैक्षणिक प्रवाहात आणण्यात येईल.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी, जि.प.
-----------------
नाशिक, सुरगाणा अव्वलस्थानी
शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहिमेत सर्वाधिक स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुरगाणा या आदिवासी तालुक्यात असून, शहरात स्थलांतर होवून आलेल्यांची संख्या नाशिक शहरात अधिक आहे. रोजगारामुळे कुटूंबासह स्थलांतर केल्याचा हा परिणाम आहे.
----------------------
तालुकानिहाय शाळाबाह्य विद्यार्थ्यांंची संख्या
* बागलाण- ३०
* चांदवड- ७२
* देवळा- ४
* दिंडोरी-१३
* इगतपुरी-४१
* कळवण-२४
* मालेगाव-३
* नांदगाव-२०
* नाशिक-१५९
* निफाड-६५
* पेठ-२०
* सिन्नर-९
* सुरगाणा-४९७
* त्र्यंबकेश्वर-६
* येवला-४४
* मनपा नाशिक- ५५६
---------------
एकूण शाळाबाह्य १५५६