दीड हजार संशयित हिटलिस्टवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:30 AM2019-09-28T01:30:41+5:302019-09-28T01:31:10+5:30
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरातील गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून जवळपास दीड हजार संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे.
नाशिक : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरातील गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून जवळपास दीड हजार संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. या संशयितांची विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार वर्गीकरण करून त्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांविरोेधात कारवाईचा फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी शुक्रवारी (दि.२७) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील सुमारे दीड हजार गुन्हेगारी वृत्तीचे संशयित पोलिसांच्या हिटलिस्टवर आहे. यातील वेगवेगळ्या गुन्हेगारांवर दाखल गुन्ह्यांपैकी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांना तडीपारीसह, स्थानबद्धता, ताब्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असणे व हाणामारी करणे यासारख्या गुन्हे असलेल्या संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा समावेश असला तर मोर्चा अथवा रास्ता रोको यांसारख्या राजकीय गुन्ह्यांचा समावेश नसल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. आरोपींवरील गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात आले असूून, दहशत पसरविणाऱ्यांविरोधात एमपीडीए कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, यात आतापर्यंत ९३ तडीपार दहा जणांना स्थानबद्ध करण्यात आले असून, यात सातपूर परिसरात दहशत माजविणाºया विशाल पोपट सांगळे (२८) सराईरात गुन्हेगारास स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याच्यासोबतच सागर प्रकाश कांबळे, बाबा उर्फ नवाज बब्बू शेख, अक्षय गणेश नाईकवाडे, तुकाराम दत्तू चोथवे, अनिकेत पंढरीनाथ वाजे, सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरणे, इलियास गुलाब शेख, जावेद उर्फ साज सल्लाद्दीन अन्सारी, अक्षय उत्तम भारती आदींविरोधात स्थानबद्ध कारवाई पोलिसांनी केली आहे.
१२ ठिकाणी नाकाबंदी
विधानसभा निवडणुकीसाठी बारा ठिकाणी नाकेबंदी करून येणाºया- जाणाºया संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाला पोलीस दलाचे २८ कर्मचारी व अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने अवैधरीत्या पैशाची वाहतूक, मद्य आणि हत्यार वाहतुकीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खून आणि अपघाती मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.