जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत दीड पटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:11 AM2021-07-03T04:11:04+5:302021-07-03T04:11:04+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २) सुमारे दीडपटीने वाढ झाली असून, नवीन बाधित संख्या दोनशेचा आकडा ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २) सुमारे दीडपटीने वाढ झाली असून, नवीन बाधित संख्या दोनशेचा आकडा ओलांडून २०१ वर पोहोचली आहे तर २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात चार नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण सुमारे पंधरवड्यानंतर पुन्हा दोनशेपार पोहोचले आहे. या रुग्णसंख्येत गत दोन आठवड्यांपासून नवीन बाधित संख्या सातत्याने शंभर ते दीडशे रुग्णांदरम्यानच रहात होती. मात्र, त्यात शुक्रवारी अचानकपणे वाढ झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने हा सूचक इशारा आहे. जिल्ह्यात काही विवाह सोहळ्यांना गर्दी होऊ लागल्याचे चित्र दिसत असतानाच बाधितांमध्ये दिसणाऱ्या वाढीला धोक्याचा इशारा मानून यंत्रणेला निर्धारित नियमांच्या अंमलबजावणीवर पुन्हा लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जिल्ह्यात शुक्रवारी गेलेल्या चार बळींमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या ८३५८ वर पोहोचली आहे.
इन्फोे
प्रलंबित अहवाल पुन्हा हजारावर
पूर्वीच्या तुलनेत बाधितांच्या अहवालांचे प्रमाण मिळण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालांची संख्या ११९२ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ५८९, नाशिक मनपाचे २७४, तर मालेगाव मनपाचे ३२९ अहवाल प्रलंबित आहेत तर जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७.२७ वर पोहोचले आहे.