शिवडे येथे दीड वर्षाचा बछडा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:03+5:302021-05-16T04:14:03+5:30
सिन्नर: तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शिवडे शिवारात भैरवनाथ मळा परिसरात दीड वर्षाचा मादी बछडा जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. ...
सिन्नर: तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शिवडे शिवारात भैरवनाथ मळा परिसरात दीड वर्षाचा मादी बछडा जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. मात्र अद्याप नर बिबट्या, मादी आणि एका बछड्याचा या परिसरात वावर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशत कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदेमाळी वस्ती, भैरवनाथ मळा या परिसरात चार बिबटे मुक्तसंचार करीत असल्याचे अनेकांनी पाहिले होते. बिबट्याने या भागात हल्ला करून वासरासह पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी सरपंच प्रभाकर हारक यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांनी केली होती. वन विभागाने भैरवनाथ मळा परिसरात विठ्ठल पोपट हारक यांच्या गट नंबर ७१२/२ मध्ये पिंजरा लावला होता. सरपंच प्रभाकर हारक यांच्यात मळ्यात या बिबट्यांनी गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला होता. तीन दिवसांपूर्वी या मळ्यात वन विभागाने पिंजरा लावून त्यात शेळी ठेवली होती. शनिवारी पहाटे दीड वर्षाचा मादी बछडा पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर अन्य बिबट्यांनी डरकाळ्या फोडल्या. सकाळी हारक यांच्यासह शेतकऱ्यांनी घटनाळी जाऊन पाहिल्यानंतर बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसून आला. प्रभाकर हारक यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सदगीर, वनरक्षक पंडित आगळे, वनमजूर बाबूराव सदगीर, रमेश कवठे, ज्ञानेश्वर माळी यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याची रवानगी मोहदरी वन उद्यानात केली.
-------------------
पिंजरा लावण्याची मागणी
भैरवनाथ मळा परिसरात दीड वर्षाचा बछडा जेरबंद झाला असला तरी या ठिकाणी अन्य तीन बछड्यांचा वावर असल्याचे सरपंच प्रभाकर हारक यांनी सांगितले. या परिसरात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत आहे. त्यामुळे उर्वरित बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी सरपंच प्रभाकर हारक यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------
सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात जेरबंद करण्यात आलेला दीड वर्षाचा बछडा. (१५ सिन्नर ४)
===Photopath===
150521\15nsk_19_15052021_13.jpg
===Caption===
१५ सिन्नर ४