चांदोरीत दीडवर्षीय बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 09:27 PM2021-12-29T21:27:10+5:302021-12-29T21:28:46+5:30
चांदोरी : चांदोरी ग्रामपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नागापूर फाटा येथील १९ महिन्यांच्या चिमुरड्या मनीषा धोंडीराम झुर्डे या मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा दावा मुलीचे वडील धोंडीराम झुर्डे यांनी प्राप्त अहवालावरून केला आहे.
चांदोरी : चांदोरी ग्रामपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नागापूर फाटा येथील १९ महिन्यांच्या चिमुरड्या मनीषा धोंडीराम झुर्डे या मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा दावा मुलीचे वडील धोंडीराम झुर्डे यांनी प्राप्त अहवालावरून केला आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मोलमजुरी करणारे धोंडीराम झुर्डे यांची दीडवर्षीय मुलगी मनीषा हिला २५ डिसेंबर रोजी अचानक अशक्तपणा आल्याने तिला तात्काळ आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना बुधवारी (दि. २९ ) दुपारी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या धोंडीराम झुर्डे यांच्या पत्नी व मुलीला शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गर्भवती महिलांना व बालकांना कुपोषण टाळण्यासाठी व रक्तवाढीसाठी औषधे, जंतनाशक, व्हिटॅमिनयुक्त औषधे, डाळी, पौष्टिक घटकांचा लाभ मिळाला नसल्याची माहिती धोंडीराम झुर्डे यांनी दिली. एकीकडे कुपोषण कमी करण्यासाठी प्रशासन गर्भवती महिलांसाठी विविध योजना सुरू करत आहे. मात्र त्यासंबंधित औषधे व पौष्टिक पदार्थांचे वाटप गरजू लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे या दीड वर्षाच्या चिमुरडीला आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप केला जात आहे.
शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेत संबंधित कुटुंबीयांना शासकीय मदतीबरोबरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- अतुल टर्ले, सामाजिक कार्यकर्ते, चांदोरी