दोन महिन्यात एक कोटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:25 PM2020-05-12T21:25:27+5:302020-05-12T23:24:24+5:30
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. देवस्थान ट्रस्टच्या उप्पन्नात गेल्या दोन महिन्यात सुमारे एक कोटी रुपयांची घट झाल्याची माहिती ट्रस्टच्या सूत्रांनी दिली. उत्पन्नात घट झालेली असली तरी ट्रस्टने कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबिलेला नाही आणि वेतनातही कपात केलेली नाही.
वसंत तिवडे ।
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. देवस्थान ट्रस्टच्या उप्पन्नात गेल्या दोन महिन्यात सुमारे एक कोटी रुपयांची घट झाल्याची माहिती ट्रस्टच्या सूत्रांनी दिली. उत्पन्नात घट झालेली असली तरी ट्रस्टने कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबिलेला नाही आणि वेतनातही कपात केलेली नाही.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे नारायण नागबली, त्रिपिंडीपासून विविध धार्मिक विधीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. याठिकाणी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक विधीसाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरावरच गावचे अर्थकारण अवलंबून आहे. या मंदिरामुळे नगर परिषदेलाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले आहेत. शिवाय, अनेकांना रोजगारही मिळालेला आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने शहराचे अर्थकारणच बिघडले आहे. या देवस्थानवर शहरातील तमाम प्रसाद विक्री केंद्रे, हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, किराणा माल, भाजी विक्री आदी व्यवसाय अवलंबून आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे हे सारे व्यवसाय ठप्प झाले आहेत. भाविक देवस्थानकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे देवस्थानच्या उत्पन्नातही घट झाली आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानला लॉकडाऊनमुळे उत्पन्नात दरमहा ५० लाख रुपयांची घट झालेली आहे. उत्पन्नात घट झालेली असली तरी ट्रस्टने कर्मचारी कपात अथवा वेतन कपातीचा मार्ग अद्याप अवलंबिलेला नाही.
देवस्थानच्या पदरी अधिकारी-कर्मचारी मिळून साधारणपणे १३० जण सेवेत आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा
सुमारे १७ लाख रुपये खर्ची
पडतात. भाविकच नसल्याने नगर परिषदेच्या वाहनतळ शुल्कच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही पूर्णपणे थांबले आहे.
-----------------
मुख्यमंत्री
निधीसाठी मदत
लॉक-डाऊनमुळे देवस्थानच्या उत्पन्नात घट झाली असली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ५१ हजारांचा धनादेश तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे सुपुर्द केला आहे तर आज कोरोना या विषाणूशी लढणाºया वैद्यकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पीपीई किट्स, मास्क व फेस शिल्ड आदी साधने दिलेली आहेत. दरम्यान, देवस्थान उत्पन्नावर परिणाम होत असला तरी देवाच्या तिन्ही त्रिकाल दैनंदिन पूजा, सोमवारचा पालखी सोहळा यात कुठेही खंड पडलेला नाही.