मंगरूळ फाट्यावर एक कोटीचा मद्यसाठा जप्त
By Admin | Published: January 17, 2017 11:14 PM2017-01-17T23:14:15+5:302017-01-17T23:14:39+5:30
ट्रकचालकाला अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; महसूल बुडविण्याचा प्रयत्न
मालेगाव : हरियाणा राज्यात उत्पादित झालेले भारतीय बनावटीचे नामांकित कंपनीचे ८६३ खोके मद्य व ट्रक असा एकूण एक कोटी ५६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाटा येथे जप्त केला. महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून नामांकित कंपनीची मद्यविक्री करण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हाणून पाडला आहे. हरियाणा राज्यात उत्पादित झालेले मद्य महसूल व कर बुडवून महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील हवालदार मुंजाब, धनंजय बदरगे, उदय शिंदे, दीपक पाटील यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाटा येथे सापळा रचला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रकमध्ये एका बंद असलेल्या वॉटर फिल्टर मशीनमध्ये लपवून आणलेल्या मद्याच्या साठ्याची पथकाने तपासणी केली. या ट्रकमध्ये विविध नामांकित कंपनीचे सुमारे ७० लाख ७१ हजार रुपयांचे मद्य आढळून आले. पथकाने ट्रक क्र. यूपी ८३ एटी ३९६८ सह मद्य असा एकूण एक कोटी ५६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक धर्मेंद्रसिंग परमानंदसिंग याला अटक केली आहे. आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची माहिती पथकातील दुय्यम निरीक्षक शेवाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)