एक कोटीच्या कर्जाचे आमिष; चार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:31 AM2019-08-24T01:31:56+5:302019-08-24T01:32:34+5:30
नागरिकांच्या फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना लबाडांनी अल्पभूधारक शेतकरी आणि पशुपालकांनाही लक्ष्य केले आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अशाच लबाडीचा बळी ठरला असून, त्याला गायीचे पशुपालन करण्यासाठी शासकीय योजनेतून एक कोटीचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून टोळीने चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
नाशिक : नागरिकांच्या फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना लबाडांनी अल्पभूधारक शेतकरी आणि पशुपालकांनाही लक्ष्य केले आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अशाच लबाडीचा बळी ठरला असून, त्याला गायीचे पशुपालन करण्यासाठी शासकीय योजनेतून एक कोटीचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून टोळीने चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
निफाड तालुक्यातील उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अजिंक्य जयवंत खापरे (२९) यांची चार लाख रुपयांची फसवणूक झाली. खापरे यांना संशयित आरोपी मुंबई नाका येथील व्ही. बिल्डिंगमधील एम्स अॅग्रो परिवार कंपनीचे संचालक महेंद्र दौलत खांदवे, शीतल महेंद्र खांदवे यांनी जितेंद्र पांडुरंग पाटील, संतोष कणसे, रामकृष्ण अभंग व सुवर्णा माजगावकर यांनी संगनमत करून अल्पभूधारक शेतकरी अजिंक्य खापरे यांना शासनाकडून गीर गायीचे पालन करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे व या पशुपालन व्यवसायातून उत्पादित होणारा माल वितरित करून त्यात ५० टक्के भागीदार करण्याचे आमिष दाखवून खापरे यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांच्याकडून एनएएफटीद्वारे चार लाख रुपयेही घेतले. परंतु, पैसे घेऊनही कर्ज मिळून न दिल्याने अजिंक्य खापरे यांनी एम्स अॅग्रो परिवारच्या संचालकांविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी संबंधित संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.