शिक्षक देणार शाळा सुधार कार्यक्रमासाठी एक कोटी सुखदेव बनकरांनी घेतली बैठक
By admin | Published: February 4, 2015 01:35 AM2015-02-04T01:35:22+5:302015-02-04T01:35:49+5:30
शिक्षक देणार शाळा सुधार कार्यक्रमासाठी एक कोटी सुखदेव बनकरांनी घेतली बैठक
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागांतर्गत कार्यरत दहा हजारांहून अधिक शिक्षकांनी शाळा सुधार कार्यक्रमासाठी त्यांचे एक दिवसाचे वेतन सुमारे एक कोटी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सुखदेव बनकर यांनी जिल्'ातील सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काल (दि.३) एक बैठक बोलविली होती. याबैठकीत शिक्षकांच्या विविध २२ प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. त्यात शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे तातडीने मंजूर करावित, शिक्षकांना वेतनश्रेणी निश्चित करावी, वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकांची वैद्यकीय बिले लवकरात लवकर मंजूर करावित, शिक्षकांचे दरमहा वेतन वेळेवर काढण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश होता. शिक्षकांच्या नियमित वेतनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी शिक्षण व लेखा विभागाला एक वेळापत्रकच तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार दरमहा ५ तारखेला मुख्याध्यापकांनी तसेच ८ तारखेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या वेतनाची देयके तयार करावित, ती १२ तारखेपर्यंत मुख्यालयात पाठवावीत, १८ तारखेला ती जिल्हा कोेषागार कार्यालयात पाठवावीत व १ तारखेला शिक्षकांचे वेतन काढण्यात यावे, असे ते वेळापत्रक आहे.