दारूची बाटली दिली नाही म्हणून एकाचा झटापटीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 11:00 PM2021-12-02T23:00:23+5:302021-12-02T23:00:53+5:30
सायखेडा : दारूची नशा काय करेल याचा नेम नाही. निफाड तालुक्यातील शिंगवे येथे दोन मद्यपी एकत्र आले. दिवसभर मनसोक्त मद्यपान झाले. सायंकाळी पुन्हा दारू आणून दे, असे म्हणत दोघांत झटापट झाली. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिंगवे मारुती मंदिराच्या पाठीमागे सायंकाळी ५ ते साडेपाच वाजेच्या दरम्यान दिलीप निवृत्ती पवार आणि दत्तू अष्टेकर दोघे दारू पीत होते. दारू संपली आणि दिलीप पवार यांनी मला दारू आणून दे, असा आग्रह दत्तूकडे धरला. दत्तू दारू आणत नसल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात दिलीपने अचानक लाथ मारल्याने दत्तू खाली पडला.
डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सायखेडा पोलिसांना समजताच सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. काद्री यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी दिलीप पवार याला ताब्यात घेतले. दत्तूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड येथे पाठवण्यात आला.
संशयित आरोपीला सायखेडा पोलीस स्टेशनला हजर करून जबाब घेतले असता त्याने आपण लाथ मारल्यामुळे दत्तू खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागल्याची कबुली दिली. सदर आरोपीवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. काद्री करत आहेत.