चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा नाशिक-सिन्नर : पुढच्या आठवड्यात जागेची मोजणी
By admin | Published: December 9, 2014 12:35 AM2014-12-09T00:35:52+5:302014-12-09T01:04:25+5:30
चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा नाशिक-सिन्नर : पुढच्या आठवड्यात जागेची मोजणी
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत नाशिक-सिन्नर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीची पुढच्या आठवड्यात गट निहाय मोजणी करून शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी जमिनी द्यावी यासाठी प्रयत्न केले जातील व नंतर एकतर्फी ताबा घेऊन जमीन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात येईल असा निर्णय सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. नाशिक-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा महिन्यांपासून रखडले असून, शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी, न्यायालयाने जमीन संपादनास स्थगिती दिलेली नाही. जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी लवदाकडे अपील दाखल केलेले आहे व त्याची सुनावणी सध्या सुरू असल्याने चौपदरीकरणाचे काम लांबणीवर पडलेले आहे. चौपदरीकरणासाठी किती जागा लागेल याची मोजणी यापूर्वी करण्यात आलेली आहे; परंतु आता प्रत्यक्ष गट कोणाच्या ताब्यात आहे व त्यातील किती जागा संपादित करावी लागेल यासाठी पुन्हा मोजणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता, या मोजणीसाठी शेतकऱ्यांचे मन वळविणे व प्रसंगी पोलिसांची मदत घेणे यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस अधीक्षक, भूमी अभिलेख, भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.