एकीकडे रहिवासी बेघर, दुसरीकडे रिकामे घर
By sanjay.pathak | Published: June 12, 2018 12:57 AM2018-06-12T00:57:44+5:302018-06-12T00:57:44+5:30
महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जात आहे.
नाशिक : महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जात आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी नेहरू नागरी अभियानांतर्गत घरकुल योजना राबविण्यात आली. सदरची योजना राबविताना महापालिकेने अधिकाधिक लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचे दावे केले होते. त्यानुसार घरकुल योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढविली होती. आनंदवल्ली येथे झोपडपट्टीच्या जागेवरच घरकुल योजना राबविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्यानंतर शिवनगर येथील रहिवाशांना राजी केले आणि त्यानंतर ८० कुटुंबाना घरकुले देऊन १२० कुटुंबांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. त्यासाठी महापालिकेने निधी संपल्याचे निमित्त केले होते. असाच काहीसा प्रकार गंजमाळ येथील घरकुल योजनेच्या बाबतीत घडला आहे. गंजमाळ बसस्थानकाच्या परिसरातील झोपडपट्ट्या हटवून भीमवाडीतील रहिवाशांना घरे बांधून देण्यासाठी राजी करण्यात आले. स्थानिक नागरिकही तयार झाले. त्यानंतर महापालिकेने घरकुल योेजना राबविण्यासाठी त्यांच्या झोपड्या हटवून त्यांना बसस्थानकाच्या परिसरात पत्र्याचे शेड देण्यात आले. मात्र, नंतर संबंधित रहिवाशांपैकी काहींनाच घरे मिळाली. आजही अनेक लाभार्थींना घरे मिळालेली नाहीत. दुसरीकडे मात्र वडाळा शिवारातील घरकुलांच्या तीन इमारती बांधकाम करून अक्षरश: पडून आहेत. याठिकाणी काही इमारतींमध्ये लाभार्थींना घरे मिळाली. मात्र, ते घर सोडून मूळ जागेवर राहण्यास गेल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळले होते. म्हणजे एकीकडे घरे मिळत नाही म्हणून लाभपात्र व्यक्ती यादीत नाव असूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत, दुसरीकडे घरकुलांच्या इमारती लाभार्थींच्या प्रतीक्षेत आहेत आणि तिसरीकडे मात्र ज्यांना घरे मिळाली ती पोटभाडेकरूंना देऊन मूळ जागेत राहण्यास जात आहेत. भीमवाडीत यथावकाश घरे बांधण्यात आली असली तरी अद्याप ती लाभार्थींना मिळालीच नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. गोरगरिबांच्या नावाखाली महापालिकेने ही घरकुल योजना राबविली असली तरी आता मात्र त्याच्या यशापयशाचा विचार करता त्याच्यादेखील मूल्यमापनाची गरज निर्माण झाली आहे.
चुंचाळे येथील घरकुलांना लाभार्थींची प्रतीक्षा
महापालिकेने तेथे जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहरातील सर्वात मोठी म्हणजे तीन हजार ७६० घरकुलांची योजना साकारली. आतापर्यंत ३१०० लाभार्थींना येथील घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे, तर सुमारे ६०० घरकुलांना लाभार्थींची प्रतीक्षा आहे. काही घरकुलांची सोडतही झालेली आहे. परंतु लाभार्थी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरायला विलंब लावत असल्याने ताबा देण्याची प्रक्रिया थांबली आहे.
४अनेक जण आहे त्याच जागेवर घरकुल बांधून मागत आहेत, तर चुंचाळे शहराबाहेर असल्याने तेथे जाण्यास बव्हंशी लाभार्थी इच्छुक नाहीत. त्यामुळे भिजत घोंगडे पडले आहे. याशिवाय, संजयनगरातील १४, वडाळा शिवारातील ३००, गांधीधाममधील ४, शिवाजीवाडीतील २३, भीमवाडीतील ६०, गीताईनगरातील १८ घरकुलांचा ताबा अद्याप देणे बाकी असल्याचे वृत्त आहे.