नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 03:43 PM2020-06-11T15:43:05+5:302020-06-11T15:46:48+5:30
दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केले आहे.
नाशिक : कोरोनाच्या सावखाली झालेल्या दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केल्याने आता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जून अखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या सावटात बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर दहावीची परीक्षाही अंतिम टप्प्यात आलेली असताना शेवटचा भुगोलाचा पेपर होण्यापूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला व पुढे देशात कोरोनाचा कहर वाढल्याने हा पेपर रद्द करून अन्य विषयांच्या सरासरी गुणांप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा निर्णय झाला. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे आणि त्या पुन्हा संकलित करून निकाल तयार करण्याचे आव्हान मंडळासमोर निर्माण झाले होते. लॉकडाऊनच्या काळात परीक्षक शिक्षकांना व नियामकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे पेपरची तपासणी पूर्ण होऊनही ते वेळेत नियमकांपर्यंत पोहोचू शकले नाही. तर नियमकांनाही त्यांना प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळापर्यंत पोहोचविण्यात अडचणी आल्या. या काळात विभागीय मंडळाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची विशेष परवानगी घेऊन उत्तर पत्रिका संकलनाचे काम पूर्ण केले. दहावीचे सुमारे सात हजारहून अधिक परीक्षक व साडेनऊशे नियामकांसह बारावीच्या साडेसहाशे नियामक व सुमारे सहा हजार शिक्षक व विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सक्रीय योगदान दिल्याने नाशिक विभागातील संपूर्ण उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण होऊ शकले आहे.